मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारकडून विरोधकांच्या चौकश्या लावण्यात येत आहेत आणि सत्ताधाऱ्यांना क्लीन चिट दिली जात आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दैनिक सामनातून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात आली आहे. तसेच 2024नंतर सत्ताधाऱ्यांपैकी अनेकजण तुरुंगात असतील असा दावाच आजच्या सामनातून करण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्गातील खुनांचा पाढाही अग्रलेखातून वाचण्यात आला आहे.
दीपक केसरकरांच्या फुटीर गटात किमान 10-12 आमदार असे आहेत की, ते ईडी, सीबीआयच्या भयाने पळून गेले आहेत. तुरुंगात जावे लागेल या भीतीने त्यांनी पक्षांतरे केली. काय सांगावे, उद्या म्हणजे 2024 नंतर हे सगळे पुन्हा तुरुंगात नसतील कशावरून? त्यांच्या जोडीला हा सावंतवाडीचा डोमकावळाही असेल, अशी भविष्यवाणी आम्ही आजच नागपुरातून करीत आहोत, असं दैनिक सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.
सावंतवाडीच्या मोती तलावावर फडफडणारा डोमकावळा म्हणून ख्यातकीर्त असलेले मंत्री केसरकर यांनी संजय राऊतांचा तुरुंगवास काढला. छान, त्यांना कायद्याचे ज्ञान अजिबात दिसत नाही. खोके सरकारात स्वयंभू चाणक्यांची भरमार झाली आहे. जो तो दुसऱ्यांना नैतिकता आणि शहाणपण शिकवीत आहे.
सावंतवाडीच्या मोती तलावावर फडफडणारा डोमकावळा म्हणजे दीपक केसरकर, असं सांगतानाच या डोमकावळ्याने संजय राऊतांच्या तुरुंगवासावर अज्ञानी भाष्य केले. त्यांनी राऊत यांची सुटका करताना न्यायालयाने दिलेले खरमरीत निकालपत्र एकदा भिंग लावून वाचायला हवे, असा खोचक सल्लाही अग्रलेखातून देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात सध्या अशा ठग आणि पेंढाऱ्यांचीच चलती असावी आणि राज्य त्यांच्याच हुकमाने चालतेय असे वातावरण आहे. महाराष्ट्रात मुंबईसारख्या शहरात कधीकाळी ‘अंडरवर्ल्ड’ म्हणजे गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व होते. त्यांची जागा आता या राजकीय ठग आणि पेंढाऱ्यांनी घेतली आहे.
बेइमान आमदारास ‘खोकेवाले’ म्हणून डिवचताच तो आमदार निदान त्यावर प्रतिवाद तरी करीत असे. ”आम्ही नाही त्यातले…” असा खोटा आव आणून तोंड तरी लपवत होते, पण आता आमदार जाहीरपणे म्हणू लागले आहेत की, ”होय, होय! आम्ही खोके घेतले. तुमच्या पोटात का दुखतेय?” अशा प्रकारे आमदारांनी लाज सोडल्यावर सरकारला निर्लज्ज सरकार नाही म्हणायचे तर दुसरे काय म्हणायचे?
महाराष्ट्रातले सध्याचे सरकार भ्रष्ट आणि अनैतिक आहे. पैशांचा वापर करून हे सरकार सत्तेवर आल्याचा घणाघात भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केला. डॉ. स्वामी यांनी हा घणाघात पंढरपुरात विठू माऊलीच्या साक्षीने केला. यावर ‘खोके’ आमदारांचे रक्त का उसळू नये?
डॉ. स्वामी यांच्या आरोपांवर त्यांनी प्रतिवाद का करू नये? अशा आरोपांनंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत यांना आव्हान देण्याची भाषा करणारे हे लोक डॉ. स्वामींच्या आव्हानानंतर गप्प का बसले?
सिंधुदुर्गात रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणेंचा खून पचवणारे दुसऱ्यांकडे बोट दाखवतात. या तिन्ही खुनांच्या तपासासाठी फडणवीस एखादी एसआयटी नेमणार असतील तर कोकणातले 100 सांगाडे ‘पुरावे’ म्हणून त्या एसआयटीसमोर स्वतःच हजर होतील, पण फडणवीस ते करणार नाहीत.