मुंबई: राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे भाजप डचमळला आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षाने एकदिलाने एकत्र येण्याची हीच वेळ आहे. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, बिहार, केरळ आणि राजस्थान आदी राज्यांनी मनावर घेतलं तर इतर राज्यांमध्येही जागरण होईल. त्यामुळे डोके ठिकाणावर ठेवून जमिनीवरील सत्य समजून घेऊन पावलं टाकावी लागतील, असं सांगतानाच तसे घडल्यावरच येत्या 2024मध्ये बदल होईल. नाही तर शंभर आचारी आणि रस्सा भिकारी असे घडेल, असा इशारा दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अवघे 400 दिवस उरले आहेत. मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. देशातील विरोधी पक्षांनाही तोच इशारा आहे, असंही अग्रलेखातून स्पष्ट करण्यात आलं आहे.
दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून विरोधी पक्षांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव यांनी विरोधी पक्षांचे वेगळे संमेलन भरवले होते. त्याला विरोधी पक्षातील काही प्रमुख पक्षाचे नेते उपस्थित राहिले होते.
त्यावरून ‘सामना’तून आगपाखड करण्यात आली आहे. केसीआर यांना राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागले आहेत. त्यामुळेच ते देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटत आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांची ही आघाडी भाजपविरोधी आहे की काँग्रेसविरोधी हे आधी स्पष्ट करायला हवं, असं अग्रलेखातून म्हटलं आहे.
काँग्रेसला दुबळे करून भाजपशी कसे लढता येणार? असा सवाल करतानाच गुजरातमध्ये आपने निवडणूक लढवली. त्याचा फायदा भाजपलाच झाला. भाजपला गुजरातमध्ये क्रांतिकारी विजय मिळाला. त्याचं श्रेय आपलाच द्यावं लागेल, असंही सामनातून सांगण्यात आलं आहे.
राष्ट्रीय राजकारण करणारे सर्वच राजकीय पक्ष प्रादेशिक आहेत. त्यांना काँग्रेसला दूर ठेवून राष्ट्रीय राजकारण करायचे आहे. त्यांना काँग्रेसची एवढी भीती का वाटते? शंभरच्या पुढे खासदारांचा आकडा नेण्याची क्षमता आजही काँग्रेसमध्येच आहे. काँग्रेसने खासदारांचा आकडा शंभराच्या पुढे नेल्यास दिल्लीतील सध्याचा डोलारा सहज कोसळेल, असा दावाही करण्यात आला आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडोला लोकांचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. त्याची भीती भाजपला वाटायला हवी होती. भाजपच्या विरोधकांना ही भीती का वाटत आहे? काँग्रेसशी आमचे वैचारिक मतभेद असू शकतात पण भाजपशी आमचे कधी वैचारिक मतभेद नव्हते. तरीही भाजपने देशात असे काय दिवे लावले आहेत? असा सवालही करण्यात आला आहे.
देशात अराजक निर्माण झालं आहे. शेतकरी अस्वस्थ आहे. त्याचा फायदा विरोधक एकजुटीने घेत नसतील तर कसे चालेल? काँग्रेसला वगळून किंवा काँग्रेसला लांब ठेवून विरोधी आघाडी करणे शक्य नाही. जे अशा विचाराने मेळावे आयोजित करून राष्ट्रीय राजकारणाचा एल्गार करत आहेत, तेच एकप्रकारे भाजपला 2024चा मार्ग मोकळा करत आहेत, असा दावाही अग्रलेखातून करण्यात आला आहे.