ठाकरे गट लोकसभेची एकही जागा स्वबळावर जिंकणार नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

| Updated on: Dec 29, 2023 | 2:27 PM

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला दिल्यानंतर महाविकास आघाडीत चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यावरून आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. याच दरम्यान काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनीही मोठं विधान केलं आहे. निरुपम यांनी थेट ठाकरे गटाला धक्का देणारं विधान केलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

ठाकरे गट लोकसभेची एकही जागा स्वबळावर जिंकणार नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गोविंद ठाकूर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 29 डिसेंबर 2023 : महाविकास आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी एक दिलाने लढण्याच्या कितीही आणाभाका घेतल्या तरी महाविकास आघाडीत कुरघोडी सुरूच आहे. ठाकरे गटाने राज्यातील लोकसभेच्या 23 जागांवर दावा केला आहे. त्यामुळे आघाडीत खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाने 23 जागा लढवल्या तर आम्ही किती जागा लढवायच्या? असा सवाल महाविकास आघाडीतून होत आहे. जागा वाटपाच्या मुद्द्यावरून वाद सुरू असतानाच काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी एक विधान करून ठाकरे गटाला डिवचलं आहे. निरुपम यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे.

शिवसेना स्वबळावर लोकसभेची एकही सीट निवडून आणू शकत नाही. माझं चॅलेंज आहे. त्यांनी स्वबळावर एक तरी जागा निवडून आणून दाखवावी. ठाकरे गटाला काँग्रेसची गरज आहे. आणि काँग्रेसलाही ठाकरे गटाची गरज आहे, असं सांगतानाच ठाकरे गटाने गेल्या निवडणुकीत जेवढ्या जागा जिंकल्या होत्या त्यापैकी अर्धा डझन खासदार पळून गेले आहेत. आता त्यांच्याकडे चार किंवा पाचच खासदार उरले आहेत. तेही त्यांच्याकडे राहणार की नाही याची गॅरंटी नाही, असा दावाच संजय निरुपम यांनी केला आहे.

राऊतांची स्मरणशक्ती क्षीण

ठाकरे गटाकडे उमेदवार नाहीत. दिल्लीचे नेते येऊन निवडणूक लढणार आहेत का?, असा सवाल त्यांनी केला. संजय निरुपम कोण आहेत? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यालाही निरुपम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राऊतांपेक्षा अधिक चांगलं मला कोण ओळखतं? कदाचित राऊत यांची स्मरणशक्ती क्षीण झाली असावी, असा चिमटा त्यांनी काढला.

तर अयोध्येला नक्कीच जाणार

काँग्रेस पक्षामध्ये काय चाललेला आहे काँग्रेसच्या नेत्याला माहित नाही तर बाहेरच्या नेत्याला काय माहीत असणार?, असा सवाल त्यांनी एका प्रश्नावर केला. अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन आहे. त्याला जाणार का? असा सवाल केला असता जर निमंत्रण आलं तर मी नक्कीच जाणार. निमंत्रण नाही मिळालं तर 22 जानेवारी नंतर जाणार, असं त्यांनी स्पष्ट केलं.

आंबेडकर यांच्या फॉर्म्युल्यानेही अडचण

दरम्यान, वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही जागा वाटपावरून महाविकास आघाडीला कोंडीत पकडलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला दिला आहे. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्याने त्यांची ताकद कमी झाली आहे. तर काँग्रेसचीही महाराष्ट्रात फारशी ताकद नाही. त्यामुळे प्रत्येक पक्षाने 12 जागा लढवाव्यात असा प्रस्ताव वंचित आघाडीने दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत टेन्शन निर्माण होण्याची शक्यता आहे.