मुंबई | 8 सप्टेंबर 2023 : राज्यात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे कोरड्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी येत्या काळात पाण्याची समस्याही उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा चिंतीत आहे. या पार्श्वभूमीवर दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांवरही या अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे. तसेच बळीराजाला वेळीच हात देण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच याच अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर एक धक्कादायक आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून भयंकर आरोप करण्यात आला आहे. मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यासाठी 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पालिकेच्या निधीतूनच हा खर्च करण्यात आला आहे, असा धक्कादायक आरोप दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
मात्र, कोणत्या पक्षाने हा खर्च केला हे मात्र, अग्रलेखात नमूद करण्यात आलेलं नाही. पण, अग्रलेखातून बॉम्ब टाकून थेट सत्ताधाऱ्यांवरच रोख धरल्याने खळबळ उडाली आहे. राज्यातील एखाद्या पालिकेतील नगरसेवक फोडण्याचं हे सर्वात मोठं ऑपरेशन असल्याचंही सांगितलं जात आहे. आमदारांवर नगरविकास खात्याने उधळपट्टी सुरू केली आहे. ती थांबवून तोच पैसा दुष्काळ निवारण्यासाठी आणि शेतकऱ्यांना जगवण्यासाठी वाचवण्याचा सल्लाही या अग्रलेखातून देण्यात आला आहे.
या अग्रलेखातून राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत:ला शेतकरी पुत्र समजत असतात. ते हेलिकॉप्टरने येऊन शेती करतात. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे पंचतारांकित शेतकरी आहेत. पवार-शिंदे यांना रताळे जमिनीत उगवते की झाडावर हे माहीत आहे. पण महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण करण्यासाठी त्यांच्याकडे काहीच उपाययोजना नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्याही ते थांबवू शकत नाही, असा चिमटाही अग्रलेखातून काढण्यात आला आहे.
याच अग्रलेखातून कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही जोरदार हल्ला चढवण्यात आला आहे. दिवंगत कवी ना. धो. महानोर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हात घातला होता. याची जाणीव कृषी मंत्र्यांना आहे काय? सध्याचे कृषी मंत्री हे फोडाफोडीत आणि स्वत:च्या कोर्टकचेऱ्यात अडकले आहेत. त्यांची शेती, बी-बियाणे वेगळे आहेत, असा हल्लाच करण्यात आला आहे. तसेच कृषी मंत्र्यांनी झोकून काम केलं पाहिजे. पण सत्कार स्वीकारण्यात मग्न आहेत, असा चिमटा त्यांनी काढला आहे.