नवी मुंबई महानगर पालिकेतील शिवसेना उबाठाच्या माजी नगरसेवकाने ठेकेदाराकडून अडीच लाखांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास ठेकेदाराचे नवी मुंबईत सुरु असलेले काम बंद पाडण्याची धमकी दिली. वारंवार फोन करुन पैसे देण्याचा तगादा लावला. अखेर नगरसेवकाने ठाण्यातील खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली. पथकाने सापळा रचून एक लाखांची रक्कम घेताना ठेकेदारास अटक केली. एम. के. मढवी असे माजी नगरसेवकाचे नाव आहे. मढवी याला आज ठाणे येथील सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ठाणे पोलिस आयुक्तालयातील खंडणी विरोधी पथकाकडे त्रिभुवन लालबिहारी सिंग (वय ४२, रा. वाघोबानगर) यांनी तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार, त्यांच्या कंपनीचे एरोली परिसरात खोदकाम सुरु आहे. इंटरनेट केबल टाकण्याचे कॉन्ट्रक्ट त्यांच्या कंपनीला मिळाले होते. हे खोदकाम सुरू असताना ऐरोली, नवी मुंबई परिसरातील माजी नगरसेवक एम. के. मढवी यांनी त्रिभुवन सिंग यांना त्यांच्या ऑफीसमध्ये बोलावले. यावेळी २ लाख ५० हजार रूपयांची खंडणी मागितली. तसेच त्यांच्या कळवा येथील घरी वारंवार फोन करून त्यांना पैसे देण्याची मागणी केली. मी नगरसेवक आहे. मला पैसे न दिल्यास काम बंद पाडेल, अशी धमकी दिली.
एम. के. मढवी यांच्याशी वेळोवेळी झालेले संभाषण त्रिभुवन लालबिहारी सिंग यांनी त्यांच्या मोबाइल फोनमध्ये रेकॉर्ड केले आहे. तसेच २६ एप्रिल रोजी अडीच लाखांपैकी दीड लाख रूपये मढवी यांनी घेत असतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यानंतर त्याच दिवशी त्यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली.
तक्रार देताना सोबत आणलेले रेकॉर्डिंग पुरावे दिले. त्यानंतर शनिवारी सायंकाळी पोलिसांनी मढवी यांच्या ऐरोली येथील पक्ष कार्यालयात सापळा रचला. त्यावेळी एम. के. माढवी यांनी त्रिभूवन सिंग यांच्याकडून एक लाख रूपये त्यांचा ड्रायव्हर अनिल सिताराम मोरे यांच्यामार्फत पक्ष कार्यालयात स्वीकारताना रंगेहात पकडले. पोलिसांनी मढवी त्यांचा चालक अनिल सिताराम मोरे यांना अटक केली. आरोपी यांच्या विरोधात कळवा पोलिस ठाणे येथे भा.दं. वि. कायदा कलम ३८४,३८५,३८७,५०६,५०६(२), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.