पक्षासाठी वानखेडे स्टेडियम खोदणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकाचा एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश

| Updated on: Jul 03, 2023 | 9:20 PM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1991 मध्ये भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध केला होता. त्यावेळी मुंबईतील वानेखेडे स्टेडियम खोदणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकाचं पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं नाव झालं. आता याच नेत्याने उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.

पक्षासाठी वानखेडे स्टेडियम खोदणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकाचा एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश
uddhav thackeray vs eknath shinde
Follow us on

मुंबई : राज्यात वर्षभरापूर्वी मोठा राजकीय भूकंप घडला होता. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी शिवसेना पक्षात बंड पुकारलं होतं. त्यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी वेगळा निर्णय घेतला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन झालं. हे सरकार आल्यापासून उद्धव ठाकरे यांना वारंवार धक्क्यावर धक्के बसत आहेत. उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षाच्या अस्तित्वासाठी निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. पण दोन्ही ठिकाणी ठाकरे यांना अपेक्षित असं यश मिळालं. निवडणूक आयोगाने तर एकनाथ शिंदे यांनाच शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल केलं. त्यामुळे ठाकरेंना मोठा फटका बसला.

विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांना एकामागे एक धक्के बसत आहेत. अनेक निष्ठावंत नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मुंबई, ठाणे, नाशिकसह संपूर्ण राज्यभरातील अनेक पदाधिकारी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. विशेष म्हणजे आज आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली आहे.

निष्ठावंत नेत्याने ठाकरेंची साथ सोडली

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने 1991 मध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियम खोदणारा शिवसेनेचा सर्वात खंदा समर्थक समजला जाणाऱ्या नेत्याने ठाकरे गटाची साथ सोडली आहे. हे नेता म्हणजे माजी आमदार शिशिर शिंदे. त्यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे विलास पारकर यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. याशिवाय मराठी सिनेसृष्टीतील कलाकार हार्दिक जोशी, अदिती सारंगधर, अक्षया देवधर आणि माधव देवचाके यांनीदेखील आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे शिशिर शिंदे हे ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. याआधी त्यांनी ठाकरे गटाच्या सदस्यत्वपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली होती. पक्षात आपल्याला योग्य संधी दिली जात नाही, आपण उपेक्षित आहोत, अशी भावना शिशिर शिंदे यांची होती. त्यातून त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

शिशिर शिंदे यांची राजकीय कारकीर्द मोठी आहे. ते एकदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि नव्या पक्षाची स्थापना केली तेव्हा शिशिर शिंदे त्यांच्यासोबत गेले होते. पण त्यानंतर काही वर्षांनी ते शिवसेनेत पुन्हा सामील झाले होते.

शिवसेना प्रवेशानंतर शिशिर शिंदे काय म्हणाले?

“महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, झपाटलेला शिवसैनिक, धर्मवीर आनंद दिघे यांचा शिष्य एकनाथ शिंदे, याठिकाणी माझ्या आग्रहाखातर आलेले खासदार राहुल शेवाळे, शिवसेनेचे लढाऊ आमदार प्रकाश सूर्वे, शिवसेनेचे अतिशय उत्तम प्रवक्ते, ठाण्यात महापौर म्हणून ज्यांनी ठसा उमटवला ते नरेश म्हस्के, विभागप्रमुख अशोक पाटील आणि इतर सर्वांचं मी स्वागत करतो”, असं शिशिर शिंदे सुरुवातीला म्हणाले.

“अनेक आंदोलन करणारे सर्व शाखाप्रमुख आज या ठिकाणी आहेत. हे सर्व चळवळीचे शिवसौनिक आहेत. गप्प बसणार नाहीत. आपणही 24 तास काम करणारे मुख्यमंत्री असून आपलं नाव महाराष्ट्राच्या इतिहासात लिहिलं जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इतिहास लिहिला जाईल”, असं शिशिर शिंदे म्हणाले.

“माझ्यात फरक पडला नाही. अभ्यासक्रम तोच आहे. कॉलेज आणि प्रिन्सिपल बदलले. इच्छा असते, चांगल्या कॉलेजमध्ये जायची. मी रिक्षाचालक होतो”, असं शिशिर शिंदे म्हणाले. तसेच “तुमच्या बरोबर प्राण असेपर्यंत राहू”, असा शब्द शिशिर शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांना दिला.