‘त्या’ प्रत्येकाला 500 रुपये दिल्याचा आरोप, शिंदेंच्या उमेदवाराविरोधात ठाकरे गटाची निवडणूक आयोगात तक्रार

| Updated on: Nov 05, 2024 | 3:36 PM

वरळी विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्याविरुद्ध ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत शोभायात्रेत सहभागींना 500 रुपये देण्याचे आरोप करण्यात आले आहेत. देसाई यांनी आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप केला असून, निवडणूक आयोगाने याची त्वरित चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

त्या प्रत्येकाला 500 रुपये दिल्याचा आरोप, शिंदेंच्या उमेदवाराविरोधात ठाकरे गटाची निवडणूक आयोगात तक्रार
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे
Image Credit source: ANI
Follow us on

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार अनिल देसाई यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. अनिल देसाई यांनी वरळीतील शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार केली आहे. वरळी येथील शोभायात्रेत 500 रुपये देऊन आम्ही या यात्रेत सहभागी झालो असल्याचं लोकांनी कबूल केलं आहे. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी तक्रार अनिल देसाई यांनी दिली आहे. आचारसंहितेचा भंग मिलिंद देवरा यांनी केला असून यांच्यावरती कडक कारवाई करावी, अशी मागणी अनिल देसाई यांनी केली आहे. अनिल देसाई यांच्या तक्रारीची गंभीर दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे. राज्य निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांना संबंधित व्हिडीओची 24 तासांच्या आत पडताळणी करुन कार्यवाही अहवाल सादर करावा, असा आदेश दिला आहे. अनिल देसाई यांच्या या आरोपांमुळे आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आता निवडणूक आयोगाकडून काय कारवाई केली जाते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अनिल देसाई यांनी तक्रारीत काय म्हटलं आहे?

महोदय, सोबत वरळी विधानसभेतील शिवसेना (शिंदे गट) उमेदवार मिलिंद देवरा यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करतानाच्या शोभायात्रेचा व्हिडिओ जोडत आहोत. सदर शोभायात्रेचे चित्रीकरण करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींनी ह्या शोभायात्रेत सहभागी लोकांना विचारले असता त्यांनी आपल्याला प्रत्येकी 500 रुपये देऊन शोभायात्रेत सहभागी होण्यास सांगितल्याचे कॅमेरासमोर कबूल केले आहे. ज्याचे असंख्य व्हिडिओज सर्व प्रसिद्धी तसेच समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत, असा दावा अनिल देसाई यांनी तक्रारीत केला आहे.

“निवडणूक आदर्श आचारसंहितेसंदर्भातील भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार पैशाचे आमिष दाखविणे हा गंभीर गुन्हा आहे. (Bribery as defined in clause (1) of section 123 of the Representation of the people Act, 1951 (43 of 1951). Under influence as defined in clause (2) of the said section)”, असं अनिल देसाई पत्रात म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

“आपणांस विनंती आहे की, या गोष्टीची त्वरित गंभीर दखल घेऊन याबाबतीत संबंधित अधिकाऱ्यांस निवडणूक आदर्श आचारसंहिता भंगासंदर्भातील भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार सख्त कारवाईचे निर्देश यावेत आणि हा बेकायदेशीर खर्च वरळी विधानसभेचे शिवसेना (शिंदे गट) उमेदवार मिलिंद देवरा यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा”, अशी विनंती अनिल देसाई यांनी केली आहे.