शिंदे-ठाकरे गटाच्या वादाचा ‘असा’ही फटका, पालिकेतील पक्ष कार्यालये आली बाकड्यांवर

| Updated on: Jan 04, 2023 | 11:22 PM

महापालिका निवडणूक रखडल्यामुळे महापौर ते नगरसेवक माजी झाले आहेत. पण वॉर्डातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना पालिकेत यावे लागते. परंतु...

शिंदे-ठाकरे गटाच्या वादाचा असाही फटका, पालिकेतील पक्ष कार्यालये आली बाकड्यांवर
Follow us on

मुंबई : मुंबई महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयावर शिंदे आणि ठाकरे गटांनी आपला दावा केला होता. शिवसेना पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यासाठी आलेल्या माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, खासदार राहुल शेवाळे, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे या शिंदे गटाच्या नेत्यांना ठाकरे गटाच्या नेत्यांनी माघारी परतण्यास भाग पाडले होते.

शिंदे-ठाकरे गटाच्या या वादानंतर सध्या पालिकेचा कारभार हाती असलेल्या पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सर्वच पक्ष कार्यालयांना टाळे लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, मनसे आणि भाजपच्या पक्ष कार्यालयांना सील ठोकण्यात आले आहे.

मुंबई महापालिका निवडणूक न झाल्यामुळे सध्या महापौर, सर्व समित्यांचे अध्यक्ष, नगरसेवक यांच्या नावापुढे माजी हे अक्षर लागले आहे. परंतु त्यांच्या वार्डातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हे सर्व माजी पदाधिकारी आपापल्या पक्षाच्या कार्यालयात बसून त्यावर मार्ग काढत असायचे. मुख्यालयात आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त व अन्य अधिकारी यांच्या भेटीगाठी घेऊन ही नेतेमंडळी नागरिकांची मदत करत असायचे.

हे सुद्धा वाचा

मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात झालेल्या वादानंतर मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष व भाजपची पक्ष कार्यालयांना सील ठोकण्यात आले त्यामुळे सामान्य मुंबईकरांच्या कामांना पुन्हा एकदा ब्रेक बसला आहे. आता पक्ष कार्यालय बंद झाल्यामुळे गटनेत्यांना नेमके भेटायचे कुठे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला होता.

नागरिकांच्या या समस्येवर उपाय म्हणून अखेर सर्वपक्षीय माजी गटनेत्यांनी एकत्र येत पक्ष कार्यालय पुन्हा उघडेपर्यंत आपापल्या पक्ष कार्यालयाबाहेरच खुले कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महापालिकेतील माजी सत्ताधारी शिवसेनेलाही स्वत:च्याच पक्ष कार्यालयाबाहेर बाकडे टाकून खुले कार्यालय सुरू करण्याची वेळ आली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बुधवारपासून पक्ष कार्यालयाबाहेर आपले बाकड्यावरचे कार्यालय सुरू केले आहे. भाजपनेही तोच पर्याय स्वीकारला आहे. महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या माजी गटनेत्या राखी जाधव आणि शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी आपल्या कार्यालयाबाहेर येऊन नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या. तसेच पालिका अधिकाऱ्यांशी बोलून त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला.

शिंदे-ठाकरे गटाच्या वादाचा फटका इतर पक्षांना बसला असून सर्वपक्षीय गटनेत्यांनी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्ष कार्यालय तातडीने उघडण्यात यावी, अशी मागणी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आयुक्त ही कार्यालय ओपन करतील अशी आशा सर्वसामान्यांसोबत माजी नगरसेवकांनी लागून राहिली आहे.