मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील म्हाडाच्या हिश्शातील घरे कोकण मंडळाला देण्यास खासगी विकासक टाळाटाळ करत आहेत. काही विकासक ही घरे म्हाडाला देण्याऐवजी घरांची परस्पर विक्री करत असल्याचा आरोप आहे. यासंबंधीची तक्रार म्हाडाच्या कोकण विभागाकडे दाखल झाली असून, हा मोठा घोटाळा असून याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ठाण्यातील ‘दर्शन सागर’ नावाच्या विकासकाने आपल्या ‘प्लॅटिनम हेरिटेज’ प्रकल्पातील 31 घरे कोकण मंडळाला देण्याऐवजी परस्पर घरे विकत नियमांचा भंग केल्याची बाब समोर आली. यानंतर ठाणे महानगरपालिकेने विकासकाविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दुजोरा दिला.
या प्रकारानंतर म्हाडाने ठाण्यातील अशा घरांचा शोध घेत 812 घरे ताब्यात घेत 14 ऑक्टोबरला सोडत काढली. कोकण मंडळाला वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईतून मात्र अशी घरे मिळालेली नाहीत. अशात आता विरारमधील नितीन राऊत नावाच्या एका व्यक्तीने वसई-विरारमधील 20 टक्क्यातील घरे विकासक अधिकाऱ्यांच्या मदतीने लाटत असून हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला आहे.
दिवाळीच्या काळात तुम्ही नवी मुंबईत घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी चालून आली आहे. सिडकोकडून नवी मुंबईत लवकरच 4900 घरांसाठी सोडत काढली जाणार आहे. अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही घरे उपलब्ध असतील.
दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या वतीने तब्बल तीन हजाराहून अधिक घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. यामध्ये दीड हजार घरे वीस टक्क्यातील व सर्व नामांकित व मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पातील आहेत. गरीब आणि आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाने पुढाकार घेतला आहे. ऐन कोरोनाकाळात जानेवारी 2020 मध्ये म्हाडाच्या वतीने इतिहासातील सर्वात मोठी म्हणजे तब्बल 5,657 घरांची सोडत काढून मोठा दिलासा देण्यात आला होता. या लॉटरीला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.
सर्व मोठ्या बांधकाम व्यवसायिकांकडून 20 टक्क्यांतील घरे सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध करुन देणे हा उद्देश ठेऊन गेल्या एक-दीड वर्षात आठ हजार घरांची सोडत काढण्यात आली. यामुळे हजारो लोकांना चांगल्या प्रकल्पांमध्ये हक्काची घरे मिळाली आहेत.
संबंधित बातम्या:
घरं घेण्यासाठी मुंबईकरांची ना ठाणे, ना नवी मुंबईला पसंती! वाचा कुठे खरेदी करतायत मुंबईकर घर खरेदी?
स्वस्तात घरं, बंगले बांधून देण्याचे आमिष, नवी मुंबईत नागरिकांची 20 लाखांची फसवणूक