निनाद करमरकर, अंबरनाथ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी धर्मवीर आनंद दिघे यांनी जामिनासाठी शरद पवार यांनी मदत केली, असे वक्तव्य नुकतेच केले होते. शरद पवार यांनी ठरवलं असतं तर आनंद दिघे टाडाच्या बाहेर आले नसते, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होते. त्यावरुन वाद निर्माण झाला आहे. या वादावर आनंद दिघे यांच्यासोबत राहिलेले शिवसैनिक अरविंद वाळेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद वाळेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना चांगलेच सुनावले आहे.
काय म्हणाले वाळेकर
शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांना टाडाच्या केसमधून शरद पवार यांनीच सोडवलं, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. यावर आता शिवसेनेचे अंबरनाथ शहरप्रमुख आणि आनंद दिघे यांचे त्या काळातले सहकारी अरविंद वाळेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिघे साहेबांचा मृत्यूनंतर ठाणे जिल्हा आपलाच होईल, असं काही जणांना वाटत होतं. मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला. आता इतक्या वर्षांनी दिघे साहेबांच्या अटकेबाबत राजकारण सुरू असल्याचा आरोप वाळेकर यांनी केला आहे.
दिघे साहेबांना टाळा लागतच नव्हता
अरविंद वाळेकर म्हणाले की, धर्मवीर आनंद दिघे साहेबांना जवळून ओळखणाऱ्या शिवसैनिकांपैकी मी एक असून दिघे साहेबांना ज्यावेळी अटक झाली आणि त्यांना टाडा लावला, तो टाडा त्यांना लागतच नव्हता. टाडा लागल्यानंतर ठाणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमधील शिवसैनिक, विद्यार्थी, व्यापारी, सर्वसामान्य नागरिक यांनी मोर्चे काढले. त्याची दखल कोर्टालाही घ्यावी लागली आणि त्यांना सोडावं लागलं. त्यामुळे आत्ता जे काही लोक याचं श्रेय घेत असतील ते चुकीचं आहे.
शिवसैनिक म्हणून आव्हाडांना विनंती
दिघे साहेबांची अटक आणि मृत्यू याचं अनेक वर्षांपासून राजकारण सुरू आहे. कारण अनेकांना असं वाटत होतं, की दिघे साहेब गेल्यानंतर ठाणे जिल्हा आमचाच होईल. परंतु त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसतील, म्हणून अशी वक्तव्य केली जात आहेत, असं म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. तसंच मी एक शिवसैनिक म्हणून अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी आव्हाड साहेबांना विनंती करतो, की दिघे साहेबांबाबत वारंवार अशी वक्तव्य करू नयेत, असंही वाळेकर म्हणाले.