मुंबई : ठाणे ते दिवा दरम्यान 5 व्या आणि 6 व्या मार्गिकेचं (Thane – Diva Railway Track) उद्धाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पार पडलं. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) या कार्यक्रमासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर या मार्गिकेवरुन रेल्वे गाडी धावली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले. पंतप्रधान मोदी यांचे सहाय्य नेहमीच महाराष्ट्राला लाभतं आणि पुढेही लाभेल अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर खासदार श्रीकांत शिंदे यांचंही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं.
ठाणे ते दिवा नव्या रेल्वे मार्गिकेच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई ते नवी मुंबई देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीचं उद्घाटन आपण कालच केलं. त्यातही केंद्राचा सहभाग, सहयोग खूप मोठा आहे. पंतप्रधान मोदींना मराठी येतं आणि चांगलं समजतं, त्यामुळे मी मराठीमध्ये बोलतोय. मी काल जे बोललो होतो की मुंबईत ज्याची सुरुवात होते. त्याचं जाळं देशभरात पसरते. मी काल सांगितलं होतं की देशात पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे अशी सुरु झाली होती. तो इंग्रजांचा काळ होता. त्याबाबतचा एख मजेशीर किस्सा मला माझ्या आजोबांनी सांगितला होता. जेव्हा रेल्वेची सुरुवात झाली तेव्हा कुणी त्यात बसायला तयार होत नव्हतं. तेव्हा रेल्वेला वाफेचं इंजिन होतं. लोकांना वाटायचं की ही इंग्रजांची भुताटकी आहे की काय. यात जो कुणी जातं तो गायब होतं, असं तेव्हा सांगितलं जायचं. त्यामुळे त्यात बसायलाच कुणी तयार होत नव्हतं. मग त्यांनी त्यावेळी एक शक्कल लढवली की जो कुणी ठाण्याला जाऊन परत येईल त्याला 1 रुपया बक्षीस आणि त्याचा सत्कार केला जाईल. त्यावेळी एक रुपयाचंही मोठं महत्व होतं. त्यानंतर हळूहळू लोकांचं येणं जाणं सुरु झालं. मग इंग्रजांनी एक रुपयाचा आठ आणे केली आणि पुढे इंग्रजांनी ते ही बंद करुन तिकीट आकारण्याला सुरुवात केली. तिथून रेल्वेचा प्रवास आजपर्यंत आला आहे.
#थेटप्रसारण
प्रधानमंत्री @narendramodi यांच्या हस्ते #ठाणे आणि #दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या नवीन रेल्वे मार्गिकेचे लोकार्पण आणि अतिरिक्त उपनगरीय सेवांचा ठाणे व दिवा येथून शुभारंभ होत आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री #उद्धवठाकरे उपस्थित आहेत.#Livehttps://t.co/jnNzbWpLXA— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 18, 2022
यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचं कौतुक केलं. मुख्यमंत्री म्हणाले की, खासदार श्रीकांत शिंदे हे तरुण आहेत, चांगलं काम करत आहेत. त्याला एखादी जबाबदारी दिली की तो पूर्ण करतो. त्याच्या मतदारसंघात एक पुरातन अंबरनाथ मंदिर आहे. त्या परिसरात गेल्यावर मी त्याला बोललो की अरे श्रीकांत यासाठी काहीतरी कर. तो परिसर त्याने इतका सुंदर केला आहे की आज तिथे गेल्यावर पवित्र वाटतं. तर अशा या सगळ्या गोष्टीचा तो पाठपुरावा करत आहे.
Inauguration Ceremony of the 5th and the 6th new railway line between Thane and Diva Junction – LIVE https://t.co/CGKCjscGnt
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 18, 2022
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ‘आज ज्या रेल्वे मार्गाचं उद्घाटन आपण केलं. ते करत असताना अनेक अडचणी स्थानिक पातळीवरुन आल्या. त्या सोडवण्यासाठी खूप प्रयत्न झाले. त्याला केंद्राकडून मोठी मदत मिळाली. पंतप्रधान मोदी आपणही त्यासाठी मोठं सहकार्य केलं. त्यामुळेच आज हे दिवास्वप्न सत्यात उतरलं आहे. याचा लाभ हजारो लाखो मता-भगिनी आणि बांधवांना होणार आहे. आपण रस्ते, रेल्वे, जल वाहतूक यांचं जाणं विणू तेवढा विकास जलदगतीने होतो. या एकप्रकारे विकासाच्या वाहिण्या आहेत. विकास झाल्यानंतर लोकसंख्या वाढते. त्या वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरवण्याचा विचार करुन या अधिकच्या रेल्वे मार्गिकेची निर्मिती आपण केलं. मोदीजी आपलं सहाय्य नेहमीच महाराष्ट्राला लाभतं आणि पुढेही ते मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो’, असं मतही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलंय.
इतर बातम्या :