गणेश थोरात, मुंबई, दि. 23 फेब्रुवारी 2024 | शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर दोन्ही गटात वाद सुरु झाला संपण्याची चिन्ह नाही. दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. आता आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात केलेल्या भाषणाला जोरदार उत्तर युवासेनेकडून देण्यात आले आहे. त्यासाठी बॅनरबाजीचा आधार घेतला आहे. त्यात ठाण्यामध्ये नका भाषण झाडू, युवा सेनेने ठरवले तर वरळीत येऊन पाडू, असा सरळ इशारा दिला आहे. ठाणे शहरात या बॅनरजी जोरदार चर्चा रंगली आहे.
‘इलाका भी हमारा धमाका भी हमारा’, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात येऊन केले होते. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी बॅनरच्या माध्यमातून युवा सेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. “ठाण्यामध्ये नका भाषण झाडू, युवा सेनेने ठरवले तर वरळीत येऊन पाडू” अशा प्रकारचा मजकूर लिहिला आहे. या बॅनरबाजीतून आदित्य ठाकरे यांना प्रतिउत्तर देण्यात आले आहे.
ठाण्यातील कॅडबरी जंक्शन या ठिकाणी रेमंड मैदान या ठिकाणी युवा सेनेचा राज्यस्तरीय मेळावा 24 फेब्रुवारी सायंकाळी चार वाजता पार पडणार आहे. ठाण्यात शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेची बॅनरबाजी जागो जागी दिसत आहे. या मेळाव्यात 36 जिल्हयातून युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत. त्यामुळे या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगामी लोकसभा निवडणूक पाहता युवा सेनेला काय कान मंत्र देतात हे पाहणे गरजेचे राहणार आहे.
आदित्य ठाकरे यांनी १८ फेब्रुवारी रोजी ठाणे दौरा केला होता. त्यात हे चिंदी चोरांचे सरकार असल्याचा आरोप केला होता. ठाण्यात महिला सुरक्षित आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. या ठाण्यातून सांगतोय की इलाका भी हमारा आणि धमाका भी हमारा. ठाण्यात येऊन सांगतो आता बदल घडवणार म्हणजे घडवणार,असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले होते.