भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि सामाजिक स्वातंत्र्याचे उद्गाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या 14 एप्रिल रोजी जयंती आहे. बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने संपूर्ण देशभरात जल्लोष करण्यात येत असतो. देशातच नव्हे तर विदेशातही बाबासाहेबांना मानवंदना दिली जाते. वैचारिक कार्यक्रम ठेवून बाबासाहेबांना अनोखं अभिवादन केलं जातं. मुंबईतही बाबासाहेबांना यंदा अनोखं अभिवादन करण्यात आलं आहे. प्रसिद्ध वांद्रे-वरळी सी लिंकवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा झळकावण्यात आली आहे. लेझर शोच्या माध्यमातून ही प्रतिमा झळकवण्यात आली आहे. त्यामुळे हा अनोखा नजारा पाहून येणाऱ्या जाणाऱ्यांचे ऊर भरून येताना दिसत आहेत.
उद्या 14 एप्रिल रोजी बाबासाहेबांची जयंती आहे. या निमित्ताने वांद्रे-वरळी सी लिंकवर आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. यावेळी सी लिंकवर लेझर शो करण्यात आला असून या लेझर शोमध्ये बाबासाहेबांच्या दोन प्रतिमा दिसत आहेत. त्याशिवाय तिरंगा झेंडा आणि अशोक चक्रही या लेझर शोमध्ये दिसत आहे.
विस्तीर्ण असा वांद्रे-वरळी सी लिंक… त्यावर लावलेले दिवे… विद्यूत रोषणाई आणि लेझर शोमधून दिसणाऱ्या प्रतिमा… वर ढगांचं अच्छादन तर पुलाखाली अथांग पसरलेला काळाशार अरबी समुद्र… या पार्श्वभूमीवर हा लेझर शो पाहून येणारे जाणारे हरखून जात आहेत. बाबासाहेबांची प्रतिमा दिसताच अपसूकच तोंडातून जयभीम असे उद्गार येत आहेत.
वांद्रे वरळी सी लिंकवरील लेझर शोमधून बाबासाहेबांची प्रतिमा पाहायला मिळत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे असंख्य लोकांनी सी लिंककडे धाव घेतली. महामानवाची प्रतिमा पाहण्यासाठी लोक येत होते. महापुरुषाची ही तस्वीर आपल्या मोबाईलमध्ये क्लिक करण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू होती.
दरम्यान, उद्या आंबेडकर जयंती आहे. त्यानिमित्ताने हजारो लोक चैत्यभूमीला बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी येत असतात. मात्र, उद्या रविवार असल्याने रेल्वेने नेहमीप्रमाणे मेगा ब्लॉक घेतला आहे. हा मेगा ब्लॉक रद्द करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे. खासदार राहुल शेवाळे यांनीही मेगा ब्लॉक रद्द करण्याची मागणी केली आहे.