लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रात सभांचा धडाका सुरु आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला मोर्चा आता मुंबईकडे वळवला आहे. 15 तारखेला महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे. रात्री 8 वाजल्यापासून घाटकोपरच्या LBS मार्गावरील श्रेयस सिनेमा ते गांधी मार्केटपर्यत अडीच किलोमीटरचा रोड-शो होणार आहे. LBS मार्गावरील रोड-शोसाठी वाहतूक पोलिसांकडून निर्बंध जारी करण्यात आले आहेत.
LBS-गांधीनगर जंक्शन- नौपाडा जंक्शन-माहूल घाटकोपर मार्ग दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत बंद राहणार आहे. मेघराज जंक्शन- आरबी कदम जंक्शनपर्यंतची वाहतूकही बंद राहणार आहे. अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, घाटकोपर जंक्शन ते साकीनाका जंक्शन हे मार्ग बंद केले जाण्याची शक्यता आहे.
हिरानंदानी कॉम्प्लेक्स ते गुलाटी पेट्रोल पंपापर्यंत वाहतूक बंद केली जाऊ शकते. गोळीबार मैदान, घाटकोपर मेट्रो स्टेशन पश्चिमेकडील सर्वैदय जंक्शनपर्यंत वाहतूक बंद राहू शकते.
2019 च्या लोकसभेत मुंबईतील सहाही जागांवर महायुतीनं विजय मिळवला होता. दरम्यान मुंबईतील या सहाही जागा राखण्याचं आव्हान पुन्हा महायुतीसमोर असणार आहे. मात्र, राज्यभरात आणि खास करुन मुंबईत उद्धव ठाकरेंप्रती मोठी सहानुभूती निर्माण झालीये. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या रोड शोच्या माध्यमातून मतदारांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न महायुतीचा असणार आहे.
दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव उमेदवार आहेत. मात्र, ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले जाधव दाम्पत्यावर जनतेची नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अरविंद सावंतांना ही निवडणूक सोप्पी जाणार असल्याची चर्चा आहे.
दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाचे अनिल देसाई विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे अशी थेट लढत आहे. या मतदारसंघात काँटे की लढाई होण्याची शक्यता आहे.
उत्तर पश्चिम मुंबईतून ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकरांची लढत शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकरांशी होईल.. या मतदारसंघात रवींद्र वायकरांविरोधात नाराजी तर ठाकरे गटाप्रती असलेल्या सहानुभूतीचा फायदा आणि मनसेनं वायकरांना केलेला विरोध हा अमोल किर्तीकरांना फायद्याचा ठरु शकतो.
उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध भाजपचे अॅड. उज्ज्वल निकम यांचा सामना होईल.. दरम्यान उत्तर मध्य मुंबईत ठाकरे गटाचा चांगला होल्ड असल्यामुळे वर्षा गायकवाडांना याचा फायदा होऊ शकतो. तसंच विरोधी उमेदवार उज्ज्वल निकमांचा या मतदारसंघात जनसंपर्क नसल्याची चर्चा आहे.
तर उत्तर मुंबईतून भाजपनं केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी दिलीय..तर काँग्रेसकडून भूषण पाटलांना उमेदवारी देण्यात आलीय..
मात्र, या मतदारसंघात पीयूष गोयल यांची बाजू मजबूत आहे.
मुंबई उत्तर पूर्वमधून भाजपचे मिहीर कोटेचा विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय दिना पाटील यांच्यात सामना रंगणारय.. या मतदारसंघात देखील काँटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा दिलाय. त्यामुळे 17 तारखेला शिवाजी पार्कात महायुतीसाठी मनसेकडून सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेत पहिल्यांदाच राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार आहे. त्यामुळे मुंबईचा गड राखण्यासाठी महायुतीकडून चांगलीच मोर्चेबांधणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील 4 टप्प्यानंतर महायुतीनं आता मुंबईकडे आपलं लक्षकेंद्रीत केलंय. त्यामुळे 15 तारखेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो. आणि 17 तारखेच्या सभेचा महायुतीला फायदा होणार की उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीसमोर महायुती ध्वस्त होणार हे 4 जुननंतरच समोर येईल.