मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम दर्गा येथे समुद्रात नवीन हाजी अली तयार करण्यात येत असल्याचा दावा केला आहे. माहीम समुद्रात अनधिकृतपणे जागा बळकावून कबर तयार करण्यात आली आहे. तिथे दर्गा तयार करण्यात येत असून आजूबाजूला अनधिकृत बांधकामही करण्यात आल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरे यांच्या या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या जागेची पाहणी केली. तर मगदूम शाह बाबा दर्गाहचे ट्रस्टी सोहेल खंडवानी यांनी राज ठाकरे यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. राज ठाकरे म्हणतात त्या जागेवर दर्गा नाही. कबरही नाही. तिथे एक बैठक आहे. ती बैठक 600 वर्ष जुनी आहे. तसेच ती वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृतही आहे, असं सांगतानाच या बैठकीच्या आसपास जर अनधिकृत बांधकाम असेल तर ते जरूर तोडण्यात यावे. आमचा त्याला विरोध वा आडकाठी राहणार नाही, असं सोहेल खंडवानी यांनी स्पष्ट केलं आहे.
मगदूम शाह बाबा दर्गाहचे ट्रस्टी सोहेल खंडवानी यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना हा दावा केला आहे. माहीम दर्ग्याच्या पाठी कोणतीही कबर नाही. कोणतीही अनिधिकृत कबर बनवली जात नाहीये. ज्यांचा मृत्यू होतो आणि त्यांचं पार्थिक जिथे दफन केलं जातं. त्याला कबर म्हणतात. ही कबर नाही. ही एक बैठक आहे. 600 वर्षापूर्वी मगदूमशहा बाबा त्या ठिकाणी शिक्षण घेत होते. अशा दोन प्रकारच्या बैठका आहेत. एक इथे आणि दुसरी माहीम पोलीस स्टेशनमध्ये आहे. माहीम पोलीस स्टेशनमध्ये अॅक्सेस नसतो म्हणून लोक इकडे येतात. दर्शन घेण्यासाठी येतात, असं सोहेल खंडवानी यांनी सांगितलं.
ही 600 वर्ष जुनी बैठक आहे. वक्फ बोर्डाने त्याची नोंदणीही केलेली आहे. राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंब धार्मिक प्रवृत्तीचे आहेत. माहीम दर्ग्यातही ते येऊन गेलेले आहेत. त्याच्या बाजूला अनधिकृत बांधकाम असेल तर त्यावर कारवाई केली पाहिजे. आम्ही अनधिकृत बांधकामाचं समर्थन करणार नाही. कोणतीही संस्था हे बांधकाम तोडायला येणार असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू. या बैठकीच्या आजूबाजूला जर अनधिकृत बांधकाम तोडायचं असेल तर आम्ही त्याला सहकार्य करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, या दर्ग्या भोवतीचे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 7 जणांचं पथक तयार केलं आहे. हे पथक आज सकाळी 8 वाजता माहीमच्या खाडीत जाऊन त्या जागेची पाहणी करेल. त्यानंतर अनधिकृत बांधकाम तोडलं जाईल. हे बांधकाम तोडण्यासाठी महापालिका पोलिसांची मदत घेईल. वरिष्ठ पोलीस अधिकारी या जागेची पडताळणी करणार आहेत. जिल्हाधिकाऱ्याच्या अख्त्यारीत जागा आहे. पोलीस आणि जिल्हाधिकारी दोघेही पाहणी करणार आहेत. अनधिकृत बांधकाम असेल तर पाडले जाणार आहे.
हा इतिहासकालीन दर्गा आहे. त्याच्या पुढे समु्द्रात अनधिकृतपणे बांधकाम उभं केलं. माहिम पोलीस स्टेशन जवळ हे बांधकाम झालं आहे. लक्ष नाही. महापालिकाचे लोकं उभे असतात. पण पाहिलं नाही. दिवसाढवळ्या तुमच्या डोळ्यांसमोर नवीन हाजीअली तयार करणार? आता प्रशासन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस कमिश्नर, महापालिका आयुक्तांना आजच सांगतो महिन्याभरात कारवाई झाली नाही तर त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपती मंदिर उभं केल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाहीत, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता.
वाट्टेल ते फाजील चाळे चालणार नाही. एकदा माझ्याकडे राज्य आलं तर अख्खं राज्य सुतासारखं सरळ करेन. परत कुणाची वाकडी नजर करण्याची हिंमत होणार नाही, असंही ते म्हणाले.