ब्रिजभान जैसवार, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 13 फेब्रुवारी 2024 : चेन्नईहून मुंबईच्या दिशेला येणाऱ्या विमानात धमकीची चिठ्ठी सापडली आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. ही चिठ्ठी नेमकी कुणी दिली? असा प्रश्न विमानाच्या क्रू मेंबर्सना पडला. पण तरीही त्यांनी न भीता संभाव्य परिस्थितीचा सामना करण्याचा निश्चय केला. विमान आकाशात असताना अशाप्रकारची चिठ्ठी सापडणं हे खरंच गंभीर आहे. कारण विमानात बसलेल्या प्रवाशांना आपातकालीन परिस्थितीत बाहेर पडताना अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे विमान प्रवासावेळी संपूर्ण प्रकारची काळजी घेतली जाते. असं असलं तरी मुंबईत येणाऱ्या एका विमानात धमकीची चिठ्ठी सापडली.
इंडिगो एरलाईन्सच्या चेन्नईवरून मुंबईला येणाऱ्या विमानात धमकीची चिठ्ठी सापडल्याची माहिती समोर आली आहे. विमानाच्या स्वच्छतागृहात धमकीची चिठ्ठी सापडली आहे. “मुंबईला याल तर सगळे मरतील”, अशा आशयाचा मजकूर या चिठ्ठीत होता. मिळालेल्या माहितीनुसार, टिशू पेपरवर धमकीचा मजकूर लिहिण्यात आला होता. विमान मुंबईला लँड करण्याच्या काही मिनिटांपूर्वी धमकीची चिठ्ठी सापडली.
केबिन क्रूच्या निदर्शनास चिठ्ठी येताच त्यांनी तात्काळ पायलटला कळवलं. कॅप्टनने तात्काळ एअर ट्राफिक कंट्रोलला माहिती दिली. त्यानंतर विमान मुंबईत लँड करताच संपूर्ण विमानाची आणि प्रवाशांची तपासणी करण्यात आली. विमानात काहीही संशयास्पद न सापडल्याचा खुलासा मुंबई पोलिसांनी केला आहे. मुंबई पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.