वसई : वसईत ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणांची दादागिरी पाहायला मिळाली. या तरुणांना महिला पोलिसांनी पकडल्यानंतर महिला पोलिसाशीच हुज्जत हे तरुण घालत होते. धक्कादायक म्हणजे, बाईक चालवणाऱ्या तरुणाने दंडाची रक्कम न देता, 2000 रुपयांची नोट महिला पोलिसावर भिरकावली आणि यातले 100 रुपये चकना खाण्यासाठी ठेव, असे म्हणत अरेरावी केली. वसईतील अंबाडी रोडवर काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
पंकज राजभर, विवेक सिंग, सुमित वाघरी असे टवाळखोर तरुणांची नावे आहेत. या टवाळखोर तरुणांविरोधात माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन, त्यांना बेड्याही ठोकण्यात आल्यात. वसई न्यायालयाने या टवाळखोर तरुणांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
नेमकं काय झालं?
एक जानेवारी रोजी विवेक सिंग, सुमित वाघरी, पंकज राजभर हे तिघेही एकाच बाईकवरुन वसई रेंज नाक्यावरुन जात असताना, वाहतूक पोलिसांनी त्यांना थांबवलं. त्यांच्याकडे लायसन्स मागितलं, तर ते तिघांपैकी कुणाकडेच नव्हतं. शिवाय, गाडीचे कागदपत्रंही नव्हते. हेल्मेट नव्हते. त्यामुळे त्यांना दंड आकारुन वाहतूक पोलिसांनी पावती फाडली आणि वाहतूक शाखेच्या कार्यालयात दंड भरण्यास सांगितलं. मग त्यानुसार हे तिघे तरुण दंडाचे पैसे भरण्यास वसईच्या अंबाडी येथील वाहतूक पोलीस चौकीत आले होते. त्यांच्या कृत्याचा त्यांना एकूण दंड 4,500 रुपये भरण्यास सांगितले. पण त्यांच्याजवळ तेवढे पैसे नसल्याने तडजोड करुन, या तिघांना 2,100 रुपये भरण्यास सांगितले.
अंगात मग्रुरी असलेल्या या तिघांपैकी पंकज राजभर याने तेथे कार्यरत असलेल्या पोलीस नाईक स्वाती गोपाले या महिला पोलिसांशी हुज्जत घातली आणि कामात अडथळा करुन, तिच्या दिशेने दोन हजाराची नोट फेकून 100 रुपये चकण्यासाठी ठेव, असं उद्धट शब्द वापरले.
वाहतूक महिला पोलिसाने आपल्या वरीष्ठांना सांगून या तिघांविरोधात माणिकपूर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. माणिकपूर पोलिसांनी तिघांवर भादंवि कलम 353 प्रमाणे सरकारी कामात अडथळा, कर्मचाऱ्यांशी उद्धट वर्तुणूक अन्वये गुन्हा दाखल करुन, अटक केली आहे. आज वसई न्यायालयात तिघांना हजर केलं असता, तिघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.