नवी मुंबई : कळंबोली येथील सुधागड शाळेच्या बाहेर हातगाडीवर ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होण्याआधीच शाळेच्या दोन शिपायांनी टायमर सॉकेट तोडल्याने मोठा अनर्थ टळला. हातगाडीवर ठेवण्यात आलेल्या बॉम्बला टायमर लावण्यात आले होते. यात दुपारी एक वाजण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र दुपारी 12.30 वाजता शाळेचे शिपाई गोपाळ कुंभार आणि विश्वकर्म यांनी सिमेंटच्या बॉक्सला लावण्यात आलेले टायमर वेगळे केले.
लोखंडी पेटी मध्ये सिमेंटचा बॉक्स ठेवण्यात आला होता. त्याला बाहेरुन घड्याळाला वायरने टायमर जोडला होता. गोपाळ कुंभार यांनी वायरी तोडून टायमर वेगळा केल्याने दुपारी एक वाजता होणारा मोठी दुर्घटना टळली.
यानंतर नवी मुंबई पोलिसांनी सदरचा बॉम्ब रात्री 10 वाजेपर्यंत निकामी करण्याचा प्रयत्न केला. मात्र यात यश न आल्याने तळगाव येथील सीआरपीएफच्या बॉम्बशोधक पथक आणि मुंबईचे पथक पाचारण केले. त्यांनी स्कॅनिंग मशीन लावून सिमेंटचा बॉक्स चेक केला. मात्र, आतमध्ये काय ठेवले आहे याचा नेमका अंदाज न आल्याने रात्री 2 वाजता कळंबोली कासाडी नदीच्या मोकळ्या जागेवरील निर्जन स्थळी नेवून तो निकामी केला गेला.
सिमेंट बॉक्समध्ये कोणत्या प्रकारची स्फोटकं ठेवली आहेत, याची माहिती पोलिसांनी दिली नसून सॅम्पल फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत. एटीएस टीमचे प्रमुख देवेन भारती यांनी घटनास्थळी भेट देवून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे.