मुंबई: पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम खरंतर पालिका प्रशासनाचे आहे. परंतु या धोकादायक खड्ड्यांमुळे कोणाचा जीव जाऊ नये आणि वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी आता वाहतूक पोलिसांनाच त्यांचं वाहतुकीचे नियंत्रण करण्याचे काम सोडून खड्डे बुजविण्याचे काम करावं लागत आहे . मुलुंड चेकनाका परिसरात रस्त्यावर पडलेले खड्डे आता वाहतूक पोलिसांनी बुजवण्याचे काम हाती घेतले आहे.
गेल्या आठवडाभरापासून या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच वाहतूक कोंडीतही भर पडत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनीच मंगळवारी सकाळी हे खड्डे माती टाकून बुजवायला घेतले. हे खड्डे वाहतूक पोलिसांनी बुजवून तात्पुरती मलमपट्टी तर केली आहेच परंतु कायमस्वरूपी हे खड्डे बुजवायला पालिकेला मुहूर्त कधी मिळणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावासाने आज काहीशी उसंत घेतली आहे. मात्र, पावसामुळे चिखल आणि खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाल्याने ठाण्यात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. ठाणे-नाशिक महामार्गावर तर पाच ते सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे.
दोन दिवसाच्या पावसामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आज पाऊस थांबल्यानंतरही खाड्यांमुळे आणि रस्त्याच्या बाजूला चिखल झाल्यामुळे ठाणेकर पुन्हा वाहतूक कोंडीत अडकले आहेत. ठाणे-नाशिक हायवेवर नाशिककडे जाणाऱ्या मार्गिकेवर जवळपास पाच ते सहा किलोमीटरच्या वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. दुपारनंतर ही वाहतूक कोंडी वाढली आहे. त्यामुळे नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. या वाहतूक कोंडीत अनेक अवजड वाहने असल्याने वाहतूक कोंडी अधिकच निर्माण झाली आहे. त्यातच अधूनमधून पावसाच्या सरी येत असल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत.
या वाहतूक कोंडीत एक रुग्णवाहिकाही अडकली होती. बराच वेळ ही रुग्णवाहिका अडकली होती. नंतर वाहतूक पोलिसांनी या रुग्णवाहिकेची वाहतूक कोंडीतून सुटका केली. खड्यामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी काढण्यासाठी वाहतूक विभागाच्या नाकीनऊ येत आहेत. एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी लवकरच सुटेल असं सांगितलं जात आहे.
डोक्यावर मुसळधार पाऊस, शहरात ठिकठिकाणी पाणी साचलं, ठाण्याचे पालिका आयुक्त भर पावसात रस्त्यावर
Raigad Rain | रायगडमध्ये अतिवृष्टीचा कहर, 5 जण बेपत्ता, शोध मोहीम सुरु