मुंबई: एसटी कामगारांचं जसं आमच्यावर दायित्व आहे. तसंच जनतेचंही दायित्व आमच्यावर आहे. त्यामुळे एसटी कामगारांनी आणखी ताणून धरू नये. त्यांनी कामावर परतावं. दोन महिन्याचा पगार मिळाला नाही तर एसटी कामगारांचंच नुकसान होणार आहे. कोण्या नेत्याचं नुकसान होणार नाही, असं सांगतानाच बडतर्फीची कारवाई सुरू झाली असून ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.
अनिल परब यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. एसटी कर्मचाऱ्यांशी जसं दायित्व आमच्यावर आहे, तसंच जनतेचंही दायित्व आमच्यावर आहे. त्यामुळे कामगारांनी कामावर यावं. फार ताणू नये. आता बडतर्फीची कारवाई सुरू झाली आहे. ही कारवाई सुरू झाल्यामुळे होणारं नुकसान कोणताही नेता भरून देणार नाही. कर्मचाऱ्यांचं नुकसान स्वत:चं होईल, नेत्याचं होणार नाही. दोन महिने पगार नाही मिळाला तर त्यांचं नुकसान होईल. हे त्यांनी समजून घ्यावं. 41 टक्के पगार वाढ दिली आहे. ताणून धरू नका. एका शब्दावर आडून बसू नका. बडतर्फीची कारवाई सुरू झाली आहे. आता एसटी विरोधातील कारवाई तीव्र करावी लागेल. जनतेलाही उत्तर द्यायचं आहे. एसटी ही अत्यावश्यक सेवेत आहे. त्यामुळे कामावर या, असं परब म्हणाले.
यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. ओबसी आरक्षणामुळे सरकार अडचणीत नाही. सरकार उद्या ठराव करतंय. इम्पिरिकल डेटा होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ नये असा ठराव केला जाणार आहे. आमची तीच भूमिका आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अध्यक्षाचे नियम बदलले आहेत. हात उंचावून मतदानाचा नियम पारित झाला आहे. हात वर करून किंवा आवाजी मतदानानेच ही निवडणूक होईल. तसा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यामुळे निवडणुकीला सरकार घाबरलं असं म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. मतदानात कुणाला किती मतदान मिळालं हे कळेलच. आम्ही राज्यपालांना फाईल पाठवली आहे. 28 डिसेंबरला निवडणूक घ्यायची आहे. आता बॉल राज्यपालांच्या कोर्टात आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी पुन्हा एकदा त्यांना कोणतंही समन्स आलं नसल्याचं स्पष्ट केलं. मला सीबीआयचं समन्स आलेलं नाही. कोणी तरी अफवा पसरवत आहे. किरीट सोमय्या सांगत आहेत ते रिसॉर्ट माझं नाही. सातबारा माझ्या नावावर नाही. नोटीसही सदानंद कदम यांच्या नावावर आली आहे. माझ्या नावावर आली नाही. मी कोर्टात सोमय्यांविरोधात मानहानीचा दावा केला आहे. त्यांना एक तर माझी माफी मागावी लागेल किंवा भरपाई द्यावी लागेल, असं ते म्हणाले. तसेच शिवसेना नेते रामदास कदम यांच्याबाबत अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला. रामदास कदम माझे नेते आहेत. मी शिवसैनिक आहे. त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 26 December 2021https://t.co/GYmfswHcd8 | #AjitPawar | #Mumbai | #Maharashtra |
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 26, 2021
संबंधित बातम्या:
Video : अजित पवारांच्या गाडीचे सारथ्य महिलेकडे, कोण आहे ही रणरागिणी? वाचा सविस्तर