Truck driver Strike Update | ट्रक आणि टँकर चालकांनी पुकारलेला संप काल रात्री मागे घेतला. केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांच्या बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ट्रक चालक पुन्हा आपल्या कामावर रुजू होणार असल्य़ाची बातमी आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. कारण कालपासून संपूर्ण देशभरात या संपाच्या तीव्र झळा जाणवण्यास सुरुवात झाली होती. मुंबईतील सर्वच पेट्रोल पंपांवर मंगळवारी वाहनांची मोठी गर्दी झाली होती. दुचाकी, चारचाकी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी लांबलचक रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूकीला समस्या येत होत्या. संपूर्ण मुंबापुरीत हेच चित्र होतं. ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोल मिळणार नाही, हे लक्षात येताच मोटरचालकांनी लगेच टाकी फुल करण्यासाठी पेट्रोल पंपाकडे मोर्चा वळवला. परिणामी काही पेट्रोल पंपावर इंधन काही तासात आऊट ऑफ स्टॉक झालं.
रात्री केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये यशस्वी चर्चा झाली. हिट अँड रन कायदा लागू झालेला नाहीय, असं स्पष्ट केल्यानंतर संप माघारीचा निर्णय झाला. हिट अँड रन कायद्यातील तरतुदीमुळे ट्रक आणि टँकर चालकांनी बेमुदत संप पुकारला होता. आतापर्यंत कायद्यात हिट अँड रन केसमध्ये 2 वर्ष शिक्षेची तरतूद होती. जामिन मिळून जायचा. पण आता कायद्यात बदल करण्यात आलाय. आता 10 वर्ष तुरुंगवास आणि 7 लाख रुपयापर्यंत दंड लागू शकतो. हा कायदा दुचाकीपासून कार, ट्रक, टँकर सर्व प्रकारच्या वाहनचालकांना लागू होतो. त्यामुळे ट्रक चालक संपावर गेले होते.
संप मागे घेतल्यानंतर मुंबईत काय स्थिती?
ट्रक, टँकर चालकांनी संप मागे घेतला, ही चांगली बाब आहे. पण लगेच सर्व सुरळीत झालेलं नाही. दादरच्या फळभाजी मार्केटमध्ये नेहमीसारखे भाज्यांचे ट्रक आलेले नाहीत. एरवी दादर मार्केटमध्ये सकाळच्यावेळी प्रचंड गर्दी असते. फळभाज्यांचे ट्रक मोठ्या प्रमाणात आलेले असतात. पण आज ट्रक कमी संख्येने आले. भाज्यांची आवक घटली आहे. परिणामी मुंबईकरांना आज महागड्या दराने भाजीपाला खरेदी करावा लागू शकतो. नागपूरमध्ये काही पेट्रोल पंपांवर अजूनही ठणठणाट आहे. नागरिक पट्रोल, डिझेल भरण्यासाठी येत आहेत. पण टँकर पोहोचले नसल्यामुळे त्यांना माघारी फिराव लागत आहे.