अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला आहे. या गोळीबारात त्यांच्या कानाला गोळी लागली आहे. हल्लेखोराची अजून ओळख पटली नाही. राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची हजेरी लावली आहे. पावसामुळे कोकणातील रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज मेळावा होत आहे. गडचिरोलीत पोलीस भरतीच्या 922 जागांसाठी 21 हजार उमेदवार भरतीच्या मैदानात उतरले आहे. हजारो युवक-युवती अनवाणी धावले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बारामती येथे जन सन्मान रॅलीचा आयोजन करण्यात आले आहे. दुपारी दोन वाजता मिशन हायस्कूल मैदानावर जन सन्मान रॅली होणार आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
वर्धा : वर्धा जिल्ह्यात पावसादरम्यान सेलू तालुक्यातील कोटंबा शिवारात वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. वर्धा लगतच्या नागठाणा शिवारात ही घटना घडली. वीज पडून बैलजोडीदेखील ठार झाली. दुपारच्या सुमारास जवळपास अर्धा तास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला.
बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून बत्ती गुल आहे. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. वीज नसल्याने रुग्णांचा अंधारात उपचार होत आहे. त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
उल्हास नदीची पाणीपातळी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. बदलापूरच्या चौपाटीवरील पाणीही ओसरलं आहे. सकाळपासून पडलेल्या पावसामुळे उल्हास नदीचा प्रवाह वाढला होता. मात्र पावसानं आता विश्रांती घेतली असली तरी रिमझिम पाऊस सुरूच आहे. उल्हास नदीचं पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. रात्री जर पावसाने जोर धरला तर पुन्हा उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
1931 सालापासून आमचं कुटुंब काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. मी गद्दारी करणार नाही असे सुद्धा शिरीष चौधरी यांनी म्हटले आहे. फुटलेल्या आमदारांमध्ये माझं नाव घेऊन माझी बदनामी करून स्वतःची पोळी भाजण्याचा हा प्रकार असल्याचे मत आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केले आहे.
कोकण रेल्वेच्या मार्गावर दिवाणखवटी आणि खेड दरम्यान मार्गावर दरड कोसळली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक रोखण्यात आली आहे. या मार्गावरील दरड दूर करण्यास किमान दोन ते अडीच तासांचा वेळ लागणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत पश्चिम विदर्भातील मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. अकोला येथे पश्चिम विदर्भातील 5 जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांचा जिल्हा निहाय आढावा घेतला जाणार आहे. कोणकोणत्या मतदार संघ शिवसेना उबाठा गटाने दावा करावे यासाठी ही महत्वाची बैठक घेतली जाणार आहे.
महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाखाली राजकीय पोळी भाजण्यात येत आहे. मनोज जरांगे यांनी ओबीसीमधून आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा पिच्छा सोडून आपला मोर्चा बारामतीत शरद पवारांच्या घराकडे वळवावा. त्यांच्याकडून ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी पाठिंब्याचे लेखी पत्र घ्यावे. आम्ही त्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ, असे आव्हान विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी मनोज जरांगे यांना दिले आहे.
नागपूरच्या तुळशीबाग परिसरातील स्वामी समर्थ केंद्र येथ नाग नदीवर असलेल्या भोसले कालीन संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला आहे. नागनदी लगतच्या स्वामी समर्थ केंद्र जुना गुलाब बाबा आश्रम परिसरात ही घटना घडली. स्वामी समर्थ केंद्रात सातत्याने भक्त दर्शनासाठी येत असतात. मात्र, दुर्घटना घडली त्यावेळेस सुदैवाने तिथे भक्त नसल्याने मोठी हानी टळली.
ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथाचे रत्नांचे भांडार ४६ वर्षांनंतर सुरू झाले आहे. यावेळी रत्ना भांडार यांची व्हिडिओग्राफीही करण्यात येत आहे.
मणिपूरच्या जिरीबाममध्ये CRPF आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त पथकावर अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. हा हल्ला ॲम्बुशमध्ये करण्यात आला. या हल्ल्यात एक सीआरपीएफ जवान शहीद झाल्याची माहिती समोर येत आहे.
भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री योगी म्हणाले की, समाजवादी सरकारच्या काळात कन्नौज मेडिकल कॉलेजला आंबेडकरांचे नाव देण्यात आले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे नाव बदलले. आम्ही पुन्हा आलो आणि आंबेडकरांचे नाव दिले. समाजवाद्यांनी धर्माच्या नावाखाली मागासलेले आणि दलितांचे आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न केला होता.
पश्चिम बंगालमध्ये, आयसीपी पेट्रापोल येथे गुप्तचर विभागाच्या माहितीवरून बीएसएफच्या जवानांनी सुरक्षा तपासणीदरम्यान एका बांगलादेशी प्रवाशाला 6 सोन्याच्या बिस्किटांसह अटक केली. हे प्रवाशी बांगलादेशातून भारतात सोने तस्करी करत होते. जप्त केलेल्या सोन्याच्या बिस्किटांचे वजन 700 ग्रॅम असून अंदाजे किंमत 5133913 रुपये आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाविकांना त्रास होऊ नये म्हणून बुलेटवरून करणार आषाढी यात्रा नियोजनाच्या विविध कामांची पाहणी करणार आहेत. भाजपचे आमदार समाधान आवताडे बुलेटचे स्वारथ्य करणार आहेत. एकनाथ शिंदे बुलेटवर बसून 65 एकर भक्तिसागर परिसरातून गोपाळपूर पत्रा शेड, दर्शन बारीची पाहणी करणार आहेत.
नाशिकच्या कसारा घाटात एकच वेळी 5 ते 6 गाड्यांचा अपघात झाला आहे. पाऊस आणि धुक्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. अपघातामुळे वाहतूक पूर्णपणे जाम आहे. पावसाचा जोर असल्याने वाहतूक सुरळीत करण्यास विलंब होत आहे. कसारा घाटातील अपघाताचा व्हीडिओ व्हायरल झालाय.
कल्याण -नगर महामार्गावर गुडघ्यावर पाणी साचलं आहे. कल्याण मारळ गाव ते वरप गाव दरम्यान महामार्गावर गुडघ्यावर पाणी साचलं आहे. नगर मार्गावर जाणाऱ्या व येणाऱ्या वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागत आहे. एकीकडे उल्हास नदीची पाण्याच्या पातळीत वाढ़ झाली आहे. तर दुसरीकडे पावसाचा जोर वाढल्याने नगर मार्गावरील रायते नदीचा पूल पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला आहे.
बारामतीत अजित पवारांची जन सम्मान रॅली सध्या सुरू आहे. बारामतीत पाऊस पडतोय. मात्र या पावसातही अजित पवार उपस्थितांना संबोधित करत आहेत. आम्ही सत्तेला हपापलेलो नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. चुकीचा प्रचार – फेक नरेटिव्हला बळी पडू नका, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
बारामतीत राष्ट्रवादीच्या जन सम्मान रॅली होत आहे. या रॅलीवेळी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आपला वादा पक्का असतो. राजेश विटेकरांना आमदार करूनच दाखवलं, असं अजित पवार म्हणाले.
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक कार्यालय बंद असल्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज कुठे द्यावे असा महिलांना प्रश्न पडला आहे. सिरोंचा तहसील कार्यालयासमोर तीन सेतू केंद्र ही बंद अवस्थेत आहेत.एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाला कुलूप लागले आहे.
पुण्यात पावसाचा जोर वाढला आहे, रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचलेला आहे.धरण क्षेत्रामध्ये देखील चांगला पाऊस सुरू आहे त्यामुळे धरण क्षेत्राच्या पाणी पातळीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.
थोड्याच वेळात सभेला सुरवात होणार. सुनील तटकरे, मंत्री धनंजय मुंडे दाखल.
ठाण्यातील वोल्टास कंपनी कॉटर्स समोरील उपवन तलावा जवळील घटना. आदित्य जाधव असे जखमीचे नाव. झाड पडल्यामुळे बाईकचेही नुकसान
मुंबईत दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर आज जुहू चौपाटीवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
लाडकी बहीण योजना, शेतकरी वीज बिल, विद्यार्थी योजना, शेतकरी सन्मान योजना या योजना मंजूर केल्या, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
लोणावळा- भुशी धरणाच्या पायऱ्यांवरील पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटकांना पायऱ्यांवर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. लोणावळ्यात धुव्वाधार पाऊस झाल्याने भुशी धरणावरील पायऱ्यांवरील प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी स्थानिक जीवरक्षक तसेच पोलिसांकडून पर्यटकांना भुशी धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे.
कल्याण तालुक्यातील रुंद पूल पाण्याखाली गेला असून काही गावांचा संपर्क तुटला आहे. रुंदा, फळेगाव, उशिद, मढ, आरेले, भोंगाळपाडा, हाल इत्यादी गावातील स्थानिकांचा हा ये-जा करणारा महत्त्वाचा पूल आहे. कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याचा प्रवाह या पुलावरून ओसंडून वाहत आहे. नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला असून पर्यायी रस्ता वापरण्याच्या सूचना देखील प्रशासनाने गावकऱ्यांना दिल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. राजापूर इथं वादळीवाऱ्यासह पाऊस बरसतोय. किनारपट्टी भागातसुद्धा वेगवान वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
“13 मधून 10 जागा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. भाजपच्या ज्या सीट होत्या त्या देखील आम्ही घेतलेल्या आहेत. संविधानाची हत्या रोखण्यासाठी आमची लढाई सुरूच आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्ही संविधानाची हत्या करणाऱ्यांना सत्तेत येऊ देणार नाही,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
परवानाधारक बंदुकीचा गैरवापर केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आयएएस प्रोबेशनर पूजा खेडकर यांच्या आईला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आणि पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरला निघाले आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निघाले आहेत.
कोल्हापुरातील विशाळगडावर अज्ञातांकडून दगडफेक केल्याचा आरोप… अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी संभाजीराजेही विशाळगडाकडे रवाना…
विधानसभा मतदारसंघावर कुणीही दावा करु नये, असे वरिष्ठांचे आदेश… लोकसभेतील उणिवा विधानसभेत भरुन निघतील… मराहाष्ट्रात लवकरच सन्मान यात्रा सुरु करणार… असं वक्तव्य सुनिल तटकरे यांनी केलं आहे.
चांगले दिवस आल्यानं आपण जुन्या काळातील संघर्ष विसरतो.. आपणही तेच काम केलं तर, आपल्या येण्याचा फायदा काय? भाजप आणि काँग्रेसमध्ये वेगळेपण काय आहे? असं म्हणत भाजपच्या कार्यक्रमातून नितीन गडकरी यांनी टोचले कान
उल्हास नदीच्या पाणीपातळीत झाली मोठी वाढ… रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसाने पाणी पातळी वाढली… नदीवरील चौपाटी पुन्हा पाण्याखाली… एका आठवड्यात दुसऱ्यांदा नदीची पाणी पातळी वाढली…
2024 मध्ये मोदी जिंकले म्हणणाऱ्यांनी डोकं तपासून घ्यावं… नरेंद्र मोदी अल्पमतात, त्यांचा पराभव झालाय… भाजपला सत्तेवर येऊ देणार नाही…संविधान वाचवण्यासाठी आमची लढाई सुरु… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्यात अवैध्यरित्या प्रवेश केल्याप्रकरणी दोघांना अटक… वेगवेगळ्या दिवशी प्रवेश केल्याच उघड…. बी के सी पोलीस ठाण्यात ट्रेस पासींगचा गुन्हा नोंद… लुकमन मोहम्मद शेख आणि व्यंकटेश अलुरी नावाच्या दोघांना घेतलं पोलिसांनी ताब्यात… यु ट्यूबर असलेल्या अलुरीने यु ट्यूब साठी कंटेंट जमा करण्यासाठी केला होता प्रवेश… तर लुकमन मोहम्मद शेख व्यावसायिक असल्याची माहिती समोर
ओबीसी मोठ्या प्रमाणात आहे. पण आपण जाती जाती मध्ये भांडत असतो. आपण एकत्र झालं पाहिजे. तसेच संस्थान चालवणारी माणस आता आरक्षण मागत आहेत. इंग्रजांच्या काळात ते म्हणत होते आमची जहागिरी आणि संस्थान टिकली पाहिजे. असे म्हणणाऱ्यांना आता आरक्षण का हवे आहे. असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला. ते सांगलीच्या पलूस मध्ये ओबीसी जणमोर्चा तर्फे आयोजित संविधान न्याय हक्क सभेत बोलत होते.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात दोन संशयितांनी बेकायदेशीर प्रवेश केल्याचे समोर आले. प्रकरणात मोहम्मद शफी शेख आणि व्यंकटेश नरसैय्या अलुरी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्याविरोधात बीकेसी पोलीसांनी गुन्हा दाखल केला.
काळगड मुक्ती मोहिमेला जाण्यासाठी संभाजी राजे भवानी मंडपात दाखल झाले आहेत. भवानी मंडपातील भवानी मातेचे दर्शन घेऊन संभाजी राजे विशाळगड साठी रवाना होणार आहेत.
ब्युटी सलूनमध्ये देह व्यापार करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली. नागपूरच्या धरमपेठ येथील वेस्ट हायकोर्ट मार्गावरील आनंद भंडार बिल्डिंग मधील नेचर ब्युटी सलूनमध्ये देह व्यापार सुरू होता. मसाजच्या नावावर पीडित युवतींना जास्त पैसे कमविण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतल्या जात होता.
जळगाव जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पहाटे तीन वाजेपासून पावसाची जोरदार बॅटिंग दिसून आली. तीन ते चार दिवसांपासून पावसाने जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दांडी मारली होती. तीन ते चार दिवसानंतर पावसाचं आज पुन्हा जोरदार पुनरागमन झाले.
आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सकाळीच पुणे पोलीस त्यांच्या बंगल्यात दाखल झाले. पण घरात कोणी नसल्याने पोलीस परत गेले. पुणे पोलिसांकडून त्यांना आणखी एक नोटीस देण्यात आली आहे. वापरलेलं पिस्तुल जप्त का करण्यात येऊ नये ? असा सवाल पोलिसांनी केला.
चंद्रबाबू नायडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा या निवासस्थानी येत आहेत. थोड्याच वेळात ही भेट होणार असल्याचे समजते.
ठाणे जिल्हा सध्या पाऊस सुरू झाला आहे. यंदा 54 हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जात आहे. त्यापैकी आजपर्यंत तब्बल 25 हजार 380 हेक्टर भाताची लागवड पूर्ण झाली असून उर्वरित लागवडीसाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे.
भिवंडी शहरातील खाडीलगत असलेल्या ईदगाह या झोपडपट्टीत तीन फूट पर्यंत पाणी शिरले आहे. या ठिकाणी पालिका आपत्कालीन यंत्रणा कोणत्याही मदतीसाठी पोहचली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
उल्हासनगरमधील संतोष नगर, इंडस्ट्रियल एरिया मध्ये असलेल्या निहाल प्लास्टिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आग लागली. उल्हासनगर महानगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहचून दोन तासात आगीवर नियंत्रण आणले. या घटनेत कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सगळीकडे पोहोचवा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळ्या जिल्हाध्यक्षांना सांगितले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थी जोडा. ही प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी आहे.