Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेच्या निकालात महाराष्ट्रात महायुतीला जबर फटका बसला आणि महाविकास आघाडीनं बाजी मारली. आता लोकसभेच्या निकालानुसार विधानसभा मतदारसंघाचा कौल पाहिला तर, महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येताना दिसतेय. महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यानुसार प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. म्हणजेच 48 लोकसभा मतदारसंघात 288 विधानसभा मतदारसंघ.
महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात महायुतीला 17 जागा, महाविकास आघाडीला 30 आणि इतरांमध्ये सांगलीत काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील अपक्ष निवडून आले. याच लोकसभेच्या निकालानुसार, विधानसभेत कुठं कोणाला आघाडी याचा विचार केला तर महायुती 123 जागांवर आघाडीवर आहे. महाविकास आघाडीला 154 जागांवर आघाडी आहे. याचाच अर्थ 154 जागा महायुतीच्या पारड्यात जाताना दिसतेय.
बहुमताचा आकडा आहे 145. म्हणजेच महाविकास आघाडी सत्तेत येईल असं चित्र आहे. तर इतरांना 11 जागांवर आघाडी आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत फायदा तोट्याचा विचार केल्यास 31 जागांनी महाविकास आघाडी पुढे आहे.
महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. आता लोकसभेच्या निकालानुसार, त्या त्या विधानसभा मतदारसंघात आघाडीचा विचार केल्यास 154 जागा महाविकास आघाडीकडे जाताना दिसत आहेत.
मराठवाड्यात 46 आमदार आहेत. लोकसभेच्या निकालानुसार आघाडी पिछाडीचा विचार केल्यास
भाजप 3, शिंदे गट 3 आणि अजित पवार गट 5 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 17, उद्धव ठाकरे गट 4 आणि शरद पवार गट 10 जागांवर पुढे आहे. इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत. म्हणजेच 2019च्या तुलनेत भाजपला 13 जागांचं नुकसान होताना दिसतंय. आणि काँग्रेसला 9 जागांचा फायदा आहे.
उत्तर महाराष्ट्रात 48 जागा आहेत. लोकसभेनुसार विधानसभेचा कौल बघितला तर
भाजप 23, शिंदेंची शिवसेना 5 जागांवर, अजित पवारांची राष्ट्रवादी 2 जागांवर आघाडीवर आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस 8 जागा, ठाकरेंची शिवसेना 1 जागा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 9 जागांवर आघाडीवर आहे.
मुंबई ठाणे आणि कोकणात एकूण 72 जागा आहेत. लोकसभेनुसार,
महायुतीत भाजपला 29 जागा, शिंदेंच्या शिवसेनेला 11, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागेवर आघाडी आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसला 7 जागा, ठाकरेंच्या शिवसेनेला 15 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 5 जागांवर आघाडी आहे. इतरांमध्ये 4 जण पुढे आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या 60 जागा आहेत.
भाजप 15 जागांवर, शिंदेंची शिवसेना 3 जागांवर, आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 6 जागांवर पुढे आहे. काँग्रेस 11 जागा, उद्धव ठाकरेंची शिवसेना 5 जागांवर आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 20 जागांवर आघाडीवर आहे.
अर्थात हा कौल लोकसभेच्या निकालानुसार आहे. विधानसभेत महायुती आणि महाविकास आघाडीतले पक्ष किती जागा लढवतात. त्यानुसारही बरंच काही अवलंबून असेल. पण लोकसभेत कोणत्या उमेदवाराच्या मतदारसंघात कोणत्या पक्षाला आघाडी आहे, याचा विचार केला. तर महाविकास आघाडी विधानसभेत सत्तेत येताना दिसतेय.