गोविंदगिरी महाराजांचा दावा वादात; शिवराय खरंच संन्यास घेणार होते?, Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Jan 24, 2024 | 8:47 AM

अयोध्येतल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या गोविंदगिरी महाराजांनी केलेली काही विधानं वादात सापडली आहेत. शंकरापुढे छत्रपती शिवाजी महाराज कधी काळी संन्यास घेण्याच्या विचारात होते, असा एक नवा दावा गोविंदगिरींनी केला. ज्या शिवरायांनी वयाच्या १६ व्या वर्षीच शंकराला साक्षी देवून शपथ घेतली, तेच शिवराय त्याच महादेवापुढे संन्यास घेण्याचा विचार कसा काय करणार? असाही प्रश्न उपस्थित होतोय.

गोविंदगिरी महाराजांचा दावा वादात; शिवराय खरंच संन्यास घेणार होते?, Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
Follow us on

मुंबई | 24 जानेवारी 2024 : अयोध्येच्या सोहळ्यात महाराष्ट्रातल्या गोविंदगिरी महाराजांनी केलेली विधानं वादात सापडलीयत. त्यांचं पहिलं विधान म्हणजे शिवाजी महाराज एका टप्प्यावर संन्यास घेण्याच्या विचारात होते, असं विधान गोविंदगिरींनी केलंय. मात्र इतिहासकारांच्या मते गोविंदगिरी महाराजांनी दिलेला संदर्भ आणि प्रत्यक्षातला प्रसंग वेगळा आहे. सभासदांच्या बखरीतून गोविंदगिरींनी हा संदर्भ दिल्याचं बोललं जातंय. त्या बखरीत नेमकं काय आहे? आणि गोविंदगिरींनी काय सांगितलं ते पाहूयात. बखरीत लिहिलंय की, श्री शैल्यास आले…. म्हणजे महाराजांनी श्री शैलम ज्योर्तिंलिंगाचं दर्शन घेतलं. राजीयांना देखून परम आनंद झाला…केवळ कैलास दुसरे….म्हणजे राजांना दर्शनानंतर आनंद वाटला. हे दुसरं कैलासचं आहे अशी त्यांची भावना होती. तेथे हे देह श्रीस अर्पण करावे, शिरकमल वाहावें असे योजिले. समयी श्रीभवानी अंगात आविर्भवली…. आणि बोलली की तूज ये गोष्टीत मोक्ष नाही. पुढे कर्तव्यही उदंड तुझ्या हाती करणे आहे. वर्तमान सावध झाल्यावरी कारकुनांनी सांगितले. मग श्रीस शिरकमल वाहावा, हा विचार मागे राहिला

दुसरीकडे गोविंदगिरी म्हणाले की, महाराज ३ दिवस श्री शैलमला राहिले. 3 दिवस उपवास केला.. आणि म्हणाले की मला आता राज्य करायचं नाही. मला संन्यास घ्यायचा आहे. मला पुन्हा इथून घेऊ जावू नका. मी शिवाच्या आराधनेसाठी जन्मलो आहे. मग ज्येष्ठ मंत्र्यांनी शिवरायांची समजूत काढली. स्वराज्य हेच भगवतकार्य आहे म्हणून त्यांना पुन्हा घेऊनही आले.

जाणकरांना काय वाटतं?

जाणकारांच्या मते शीरकमल आणि संन्यास या दोन्ही गोष्टींमध्ये फरकही आहे. शिवाय इतिहासाच्या दृष्टीनं सभासद बखर ही दुय्यम मानली जाते. कारण शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या २५ ते ३० वर्षानंतर राजाराम महाराजांच्या आज्ञेनं बखरींचं लिखाण झालं. इतिहास संशोधनात प्रत्यक्ष संबंधित पुरुषांनी लिहिलेल्या पत्रांना सर्वाधिक महत्व आहे.

इतिहासातील एका प्रसंगात पराभवानंतर व्यंकोजीराजे वैराग्यात राहू लागले होते. त्यावेळी खुद्द शिवरायांनी व्यंकोजींना म्हणजे आपल्या बंधूंना पत्र लिहून वैराग्य किंवा संन्यासाबद्दल त्यांचे विचार काय आहेत, ते स्पष्ट केलं होतं. महाराजांनी पत्रात लिहिलं की, पुरुषार्थ व किर्ती अर्जणे..रिकामे बसून लोकांहाती नाजीच खाववून काळ व्यर्थ गमावू नका. हे कार्यप्रयोजनाचे दिवस आहेत. वैराग्य उतारवयात चांगलं आहे. आज उद्योग करुन आम्हास तमासे दाखविणे…( म्हणजे पराक्रम करणे ) बहुत काय लिहिंणे…तुम्ही सूज्ञ असा

गोविंदगिरी महाराजांकडून आणखी वादग्रस्त वक्तव्य

यानंतर राममंदिराचे सचिव चंपत राय यांच्यानंतर गोविंदगिरींनी मोदींची तुलना शिवरायांशी केलीय. त्यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. याखेरीज गोविंदगिरी महाराजांनी पुन्हा एकदा रामदास स्वामी शिवरायांचे गुरु होते, हा वादही उकरुन काढला. यावरुन महाराष्ट्रात अनेकदा याआधीही खल झालाय. इतिहासकार, शिवरायांचे वंशज देखील रामदास स्वामी शिवरायांचे गुरु होते हा दावा नाकारतात.

यासाठी 2018 मध्ये कोर्टात खटलाही चालला आणि त्याच वर्षी औरंगाबादच्या खंडपीठानं यावर निकालही दिला होता. ज्यात इतिहासकार, तपासाधिकारी आणि अभ्यासकांची मतं विचारात घेतली गेली. त्यानुसार न्यायालयात जे पुरावे सादर झाले, त्यावरुन रामदास स्वामी आणि शिवरायांची भेट झाली होती हे सिद्ध होत नाही. शिवाय शिवाजी महाराज रामदास स्वामींना गुरु म्हणून उल्लेख करतातअसाही पुरावा नाही, असा निकाल कोर्टानं दिलाय.

मात्र असं असलं तरी खासकरुन काही भाजप नेते रामदास स्वामी हेच शिवरायांचे गुरु होते, असा दावा वारंवार करतात आणि त्यावरुन दर काही महिन्यांनी वाद उभे राहतात. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या विधानानंतर उदयनराजे भोसलेंनीही ट्विट करुन राजमाता जिजाऊ याच शिवरायांच्या गुरु होत्या. कोश्यारींचं विधान भावना दुखावणारं असून त्यांनी वक्तव्य मागे घ्यावं, अशी प्रतिक्रिया दिली होती. संभाजीराजे छत्रपतींनीही हा दावा नाकारला होता