Tv9 मराठीचा स्पेर्शल रिपोर्ट | 16 आमदारांचा निर्णय ‘असा’ होणार

| Updated on: May 12, 2023 | 11:25 PM

सत्तासंघर्षावर निकाल देताना, सुप्रीम कोर्टानं 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातलं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं. कोर्टानं ज्या प्रकारे निकालात नमूद केलंय. त्यानुसार 16 आमदार अपात्र होणार, असा दावा ठाकरे गटाचा आहे. मात्र व्हीप आणि राजकीय पक्ष या 2 गोष्टी महत्वाच्या असतील.

Tv9 मराठीचा स्पेर्शल रिपोर्ट | 16 आमदारांचा निर्णय असा होणार
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे आलंय. सरन्यायाधीश, धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की, वाजवी वेळेत, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय घ्यावा. त्यासाठी ठाकरे गट, नार्वेकरांना पत्रव्यवहारही करणार आहे. पण नार्वेकरांनी सांगितलं की, आधी 16 आमदारांना बाजू मांडण्यासाठी वेळ देणार. पुरावे सादर करण्यास सांगितलं जाणार. पुराव्यांचं परीक्षण केलं जाणार. साक्षीदारांची साक्ष नोंदवली जाणार. त्यानंतर नार्वेकरांकडून सर्व कागदपत्रांची पडताळणी होणार आणि नंतर नार्वेकर आपला निर्णय सुनावणार.

कायदेतज्ज्ञांच्या मते, 2 ते 3 महिन्यांचा कालावधी आहे. मात्र तशा कुठल्याही कालावधीचं बंधन विधानसभेच्या अध्यक्षांवर नाही. त्यांना हवा तेवढा वेळ ते घेऊ शकतात. आता ही झाली वेळ किंवा कालमर्यादेची बाब. महत्वाचा मुद्दा हा आहे की, 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कशाच्या आधारावर घेणार? महत्वाची कळी काय आहे? तर महत्वाचा मुद्दा आहे, व्हीप…. आणि राजकीय पक्ष कोणता हे ठरवून निर्णय घ्यावा असं सुप्रीम कोर्टानं निकाल देताना म्हटलेलं आहे. त्यामुळं व्हीप नेमका कोणाचा लागू होणार ? हे आधी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना ठरवावं लागेल आणि राजकीय पक्ष कोणता हेही ठरवावं लागेल.

सुनील प्रभूंचा व्हीप लागू झाला तर…

आता व्हीप बद्दल सुप्रीम कोर्टानं काय म्हटलंय ते नीट समजून घेवूया. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निकाल देताना सांगितलंय की, ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांचाच व्हीप लागू होणार. शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावलेंची नियुक्तीच चंद्रचूड यांनी बेकायदेशीर ठरवलीय.

हे सुद्धा वाचा

आता जर, सुनील प्रभूंचा व्हीप लागू होईल असं ठरवलं तर मग 16 आमदार अपात्र होतात. आता दुसरी महत्वाची बाब आहे की, राजकीय पक्ष कोणता हेही विधानसभेच्या अध्यक्षांना ठरवावं लागेल. कोर्टाच्या सुनावणीच्या काळातच निवडणूक आयोगानं, शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हं शिंदे गटाला दिलं. मात्र ठाकरे गटाचं म्हणणंय की याचा आधारच घेऊ नये. तर सुप्रीम कोर्टानं सांगितल्याप्रमाणं, पक्षाच्या घटनेच्या आधारावरच राजकीय पक्ष कोणता हे ठरवावं आणि ठाकरे गटाचं म्हणणंय की, शिंदेंकडे मूळ पक्षाची घटनाच नाही.

राहुल नार्वेकरांना 3 महिन्याच्या आतच निर्णय घ्यावा लागेल आणि 16 आमदार अपात्रच होणार असा दावा संजय राऊतांचा आहे. तर व्हीपवरुन भाजपचे नेते आणि माजी विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडेंचं म्हणणं की, सभागृहाचा व्हीप महत्वाचा ठरु शकतो, बाहेरच्या व्हीपचा अर्थ नाही. त्यामुळं 16 आमदार अपात्र ठरणार नाही. पण ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंनी याआधी सांगितलं होतं, व्हीप हा एकच होता.

30 जूनला ज्या दिवशी उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश दिले होते त्या दिवसासाठी आणि 3 जुलैला विधानसभा अध्यक्ष निवडीच्या दिवसासाठी, ज्या दिवशी राहुल नार्वेकरांची निवड झाली.

अनिल परबांनी तर आणखी एक दावा केलाय की, 16 आमदार जर अपात्र झाले तर मग, अध्यक्ष राहुल नार्वेकरांनाही जावं लागेल. कारण त्याच 16 आमदारांनी नार्वेकरांना निवडून दिलंय. ठाकरे गट आपली भूमिका स्प्ष्ट करतोय. पण आता निर्णय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरच घेणार आहेत. त्यामुळं ते काय निर्णय घेतात, हे ते निर्णयासाठी किती वेळ घेतात त्यानंतरच कळेल.