मुंबई : ‘मै राजनीती छोडना चाहता हुँ…..पर राजनिती मुझे नहीं छोडती….’, हे देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं गाजलेलं वाक्य आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लागू पडतं. शरद पवारांनी राजीनामा दिला, तो राजीनामा मंजुरीचे अधिकार पवारांनीच सूचवलेल्या एका कमिटीला गेले. दोन-चार लोक सोडली तर कमिटीतलं बहुमत हे आधीच पवारांच्या बाजूनं होतं. राजीनाम्याविरोधात खासकरुन तरुण कार्यकर्त्यांचा राग उफाळून आला आणि 7 दिवसांपूर्वी भाकरी फिरवण्याचा जो चेंडू पवारांनी टोलवला होता, तोच आता माघारी घ्या म्हणून पुन्हा पवारांच्याच कोर्टात पोहोचला.
सोहळा पुस्तक प्रकाशनाचा होता, पुस्तकाचं नाव ”लोक माझे सांगाती” त्याच कार्यक्रमात पक्षातले लोक शरद पवारांच्याच सोबतीला आहेत, हे त्यांच्या राजीनाम्यानं दाखवलं. शरद पवारांनी आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यातच आयुष्यात असं नवं पान जोडलं की जो एक स्वतंत्र पुस्तकाचा विषय होऊ शकतो. आता राजीनाम्याचा भाग अलहिदा. पण मंजूर न झालेल्या राजीनाम्यानं किती गणितं साधली गेली, याचीही चर्चा रंगतेय.
राष्ट्रवादीत फुटीचे संभाव्य तडे पडण्याआधीच ते काही काळ बुजवले गेले. पक्षावर आजही पवारांचीच पकड आहे, हे अप्रत्यक्षपणे स्वकीयांनाच दाखवलं गेलं. राष्ट्रवादीत फोडाफोडी ही सहजसोपी असणार नाही हा संदेशही परकीयांना दिला गेला. मविआत ठाकरेंकडे सहानुभूतीची लाट असताना पवारांनी राष्ट्रवादीत एनर्जी भरली. पुस्तकात ठाकरेंच्या कारभारावरही पवारांनी बोट ठेवलं आणि जर-तरची वेळ आली तर काही नेते विरुद्ध कार्यकर्ते चित्र होऊ शकतं, हे सुद्धा पवारांच्या राजीनाम्यानं दाखवून दिलं.
वैशिष्ट्यं म्हणजे 82 वर्षांच्या पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादीतले तरुण पदाधिकारी प्रचंड आक्रमक होते. त्यात सर्वात आघाडीवर असणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष मेहबूब शेख, युवती राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, युवक राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, शिख सेलचे राष्ट्रवादी प्रदेश सचिव गुरज्योतसिंग किर, दिल्लीचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, हरियाणाच्या राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना अध्यक्षा सोनिया दुहान यांचा समावेश आहे.
हे ते तरुण आहेत, जे पवारांच्या फार जवळ दिसत नाहीत. जे माध्यमांमध्येही कायम चर्चेत राहत नाहीत, मात्र ही मंडळी पवारांशीच एकनिष्ठ आहे. सोनिया दुहान यांची ओळख राष्ट्रवादीतल्या लेडी जेम्स बॉन्ड म्हणून आहे. जेव्हा शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीहून गोव्यात मुक्कामी आले, तेव्हा त्यांच्या संपर्कासाठी सोनिया दुहान आणि इतर 3 पदाधिकारी गोव्यातल्या हॉटेलमध्ये शिरले होते. पण त्यांचा प्रयत्न अयश्वशी ठरला.
अजित पवारांच्या पहाटेच्या बंडावेळी नरहरी झिरवाळांसह राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना दिल्लीजवळच्या गुरुग्रामधल्या एका हॉटेलमध्ये ठेवलं गेलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार त्या हॉटेलबाहेर पहाऱ्यासाठी भाजपचे दीडशे कार्यकर्ते होते. त्या हॉटेलमध्ये धुडगूस घालून राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना पुन्हा मुंबईत आणणाऱ्या सोनिया दुहानच होत्या.
अजित पवारांनी जेव्हा पवारांचा राजीनामा योग्य असल्याची स्पष्टपणे भूमिका मांडली, तेव्हा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नसीम सिद्दीकींनी थेट एक घाव दोन तुकड्यांची भाषा केली. अजित पवार आधी म्हणाले की शरद पवारांच्या राजीनाम्याची कल्पना त्यांना एक दिवसआधीच माहित होती. पण सभागृहातलं वातावरण तापू लागलं. नंतर जेव्हा अजित पवार बाहेर येऊन माध्यमांशी बोलले. तेव्हा पवारांचा राजीनामा आमच्या सर्वांसाठी शॉक असल्याचं ते म्हणाले.
छगन भुजबळांनी सभागृहात शरद पवारांच्या राजीनाम्याला विरोध केला. दुसऱ्या दिवशी सुप्रिया सुळे राष्ट्रीय पातळीवर पक्ष सांभाळू शकतात, असं विधान केलं. यानंतर राहुल गांधींचा सुप्रिया सुळेंना फोन आला. शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यायला हवा, असं ते म्हणाले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही सुळेंना फोन करुन तेच आवाहन केलं.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही राष्ट्रवादीचे नेते पीसी चाकोंना फोन करुन राजीनामा न देण्याचं आवाहन केलं. नंतर जितेंद्र आव्हाड आंदोलनस्थळी पोहोचले आणि राष्ट्रीय पातळीवर कम्परर्टेबल संपर्क पवारांशिवाय कुणीच साधू शकत नसल्याचं ते म्हणाले.
शरद पवारांच्या या राजीनाम्याची तुलना वसंतदादा पाटलांच्या राजीनाम्याशीही होतेय. सालं होतं 1975 चं… मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते, आणि त्यांच्या सरकारमध्ये वसंतदादा पाटील पाटबंधारे मंत्री. पक्षांतर्गत वर्चस्वाच्या वादात चव्हाणांनी वसंतदादांचा राजीनामा मागितला. वसंतदादा तडकाफडकी राजीनामा देत सांगलीत परतले.
राजीनाम्यानं वसंतदादा पाटलांबद्दल सहानुभूतीची तयार झाली. समर्थकांनी वसंतदादा पाटलांची मिरवणूक काढली. काही काळ ते राजकारणापासून अलिप्त राहिले. पण जेव्हा आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत काँग्रेस गलितगात्र झाली, तेव्हा योग्य टायमिंग बघून वसंतदादा पाटलांनी कमबॅक केलं. माझं घर जळत असताना मी स्वस्थ कसा बसू? हे कारण देत पुन्हा परतलेले वसंतदादा नंतर थेट मुख्यमंत्री बनले..
पवारांनी यावेळी वसंतदादांचा कित्ता गिरवल्याची चर्चा आहे. समजा आता राजीनामा मंजूर जरी झाला असता तरी 2024 च्या तोंडावर पवारांच्या कमबॅकची शक्यता कायम होती. राजीनाम्यानं आता सहानुभूती आणि 2024 च्या तोंडावर ”पवार इज बॅक” या घोषणेनं कार्यकर्त्यांमध्ये एनर्जीही बूस्ट होऊ शकली असती.
सत्ताधारी भाजप नेते म्हणतायत की अजित पवार कधीही भाजपसोबत येऊ शकतात, जेव्हापासून अजित पवारांना पित्त झालं, तेव्हापासून आजपर्यंत नेत्यांची विधानं आणि त्यांचा क्रम देखील महत्त्वाचा आहे. जर ही खेळी असेल तर पवारांनी पुन्हा एकदा बिनटाक्याची यशस्वी शस्रक्रिया केलीय. कारण चर्चेनुसार बंद दाराआड कितीही डाव रचले गेले असोत, पवारांनी लोकांसमोर येऊन लोकांच्या समक्ष ते डाव उलटवले आहेत.
संभाव्य फुटीचे पंख छाटले गेले आणि रक्ताचा एक टिपूसही पडला नाही. चालीत ज्यांचे मोहरे मारले गेले, त्या मोहऱ्यांना ना शहीदाचा दर्जा मिळाला, आणि ना ही पराजयाच्या भांडवलाची संधी. तूर्तास हे नाट्य असेल तर यावर शेवटचा पदडा पडलाय का? कारण पिक्चर अभी बाकी है, असं फडणवीस सुचवू पाहतायत.