VIDEO | Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : ठाकरे पुन्हा नरेंद्र मोदी यांच्याशी हातमिळवणी करणार का?

| Updated on: Apr 07, 2023 | 11:55 PM

भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकरांनी चकीत करणारी वक्तव्यं केलीत. उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत यावं, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. तर मोदींनी लहान भाऊ समजून ठाकरेंना माफ करावं, असं केसरकर म्हणतायत. पण अचानक सूर बदलण्याचं कारण काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

VIDEO | Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : ठाकरे पुन्हा नरेंद्र मोदी यांच्याशी हातमिळवणी करणार का?
प्रातािनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकरांची (Deepak Kesarkar) ही वक्तव्यं फार मोठी आणि तितकीच चकीत करणारी आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपसोबत यावं, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. मजबुरीतून आपण बोलत नसून हिंदुत्व आणि विकासासाठी उद्धव ठाकरेंनी मोदींसोबत यावं, असं चंद्रकांत दादा म्हणतायत आणि त्यासाठी पुढाकार घेण्याची तयारीही त्यांनी दर्शवलीय. आपल्या नेत्यांनी सांगितलं तर ‘मातोश्री’वरही जाणार, असं चंद्रकांत दादा सांगतायत.

चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंना सोबत येण्याबद्दल बोलतायत आणि राज्यात शिंदेंसोबतच भाजपच सरकार आहे. त्यामुळं शिंदेंच्या शिवसेनेला काय वाटतं हेही फार महत्वाचं आहे. पण मंत्री केसरकर जे बोलले त्यावरुन त्यांनाही काही अडचण नाही. मोदींसोबत जाण्याचा निर्णय ठाकरेंनाच घ्यायचा आहे, अशी प्रतिक्रिया केसरकरांनी दिलीय.

उद्धव ठाकरेंनीच निर्णय घ्यावा हे सांगतानाच, केसरकरांनी शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदावरुनही भाष्य केलंय. शिंदे, उद्धव ठाकरेंच्याच मनातले मुख्यमंत्री असल्यानं आता त्यांना अडचण नसावी असा टोलाही केसरकरांनी लगावला. चंद्रकांत पाटील असो की, दीपक केसरकर यांच्या बोलण्याचंही टायमिंग खास आहे. सत्तासंघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झालीय आणि निकाल कधीही येऊ शकतो. मात्र कोर्टाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नाही तर हिंदुत्व आणि विकासासाठी बोलत असल्याचं चंद्रकांत दादांचं म्हणणंय.

हे सुद्धा वाचा

ठाकरे पुन्हा भाजपशी हातमिळवणी करणार का?

हिंदुत्वावरुन चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना सोबत येण्याचं आवाहन केलंय. पण हिंदुत्वावरुन ठाकरेही आपल्या सभांमधून भाजपचा समाचार घेत आहेत. 2019च्या निकालानंतर महाराष्ट्रातली युती आणि आघाडीची समीकरणंच बदललीत. ठाकरेंना काँग्रेसनं, राष्ट्रवादी करण्यास मदत केली आणि शिंदेंच्या बंडानंतरही महाविकास आघाडी म्हणूनच तिन्ही पक्ष एकत्रच मंचावर येत आहेत. त्यामुळं ठाकरे पुन्हा मोदी अर्थात भाजपशी हातमिळवणी करणार का? हे सागणं सध्या कोणत्याही राजकीय पंडिताला कठीण असेल.

दरम्यान, ठाण्यात रोशनी शिंदेंना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीच्या घटनेनंतर उद्धव ठाकरे विचारपूस करण्यासाठी ठाण्यात आले होते. त्यानंतर गृहखात्यावरुन सडकून टीका करताना, उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना फडतूस गृहमंत्री म्हटलं. त्या टीकेला फडणवीसांनीही काडतूसनं उत्तर दिलंय.पण त्यावर चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना आवाहन केलंय. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची माफी मागावी. फडणवीसांचं मन मोठं आहे. ते माफ करतील. पण जहरी टीका कराल तर सहन करणार नाही, असंदेखील चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंनी वापरलेला फडतूस शब्द फडणवीसांच्या जिव्हारी लागलाय. त्यामुळं उद्धव ठाकरेंबद्दल मनात आदर नसल्याचंही म्हटलं. त्याचवेळी चंद्रकांत दादा उद्धव ठाकरेंना माफीचाही सल्ला देत आहेत आणि दुसरीकडे काहीही बोलल्यास सहन करणार नाही, असा इशाराही चंद्रकांत पाटलांनी दिलाय.