मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आगामी काळात मुंबईसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यातून मुंबई महापालिकेचं वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. महापालिका निवडणुकांनंतर लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर लगेच विधानसभेची निवडणूक असणार आहे. त्यामुळे या घडामोडींकडे राज्यांचं लक्ष असणार आहे. असं असताना गृह विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. एकीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीव मारण्याची धमकी देण्यात येत आहे. असं असताना गृह विभागाने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का देणाऱ्या दोन बातम्या समोर आल्या आहेत.
गृह विभागाकडून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षेच्या ताफ्यातील एक-एक एस्कॉर्ट व्हॅन काढण्यात आली आहे. तसेच ‘मातोश्री’ परिसरातील सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. दुसरीकडे ठाकरे कुटुंबियांच्या अतिशय जवळच्या व्यक्तींवर ईडीने छापेमारी केलीय. मुंबईतल्या कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने आज तब्बल 15 ठिकाणी छापेमारी केली आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीने धाड टाकली. तसेच खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरावरही ईडीने छापा टाकला. विशेष म्हणजे ईडीने फक्त सुजित पाटकर यांच्या घरावर छापा टाकला नाही तर सुजित पाटकरांचे बिझनेस पार्टनर राजीव साळुंखे, हेमंत गुप्ता, संजय शाह यांच्या घरावरही छापा टाकला.
कोरोना काळात लाईफलाईन कंपनी घोटाळाप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी गंभीर आरोप केले होते. कोविड सेंटर, वैद्यकीय उपकरण खरेदी कंत्राटमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. कोविड सेंटरसाठी वैद्यकीय उपकरणं खरेदी करताना अव्वाच्या सव्वा बिल आकरल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.
किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर आर्थिक गुन्हे विभागाकडून कारवाई सुरु होती. त्यानंतर आता ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे. ईडीने या प्रकरणी आज दिवसभरात तब्बल 15 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या घरीही ईडीने आज धाड टाकली.