गोरेगाव फिल्म सिटीत भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

| Updated on: Feb 24, 2024 | 9:00 PM

गोरेगाव फिल्म सिटीमध्ये एका इमारतीची भिंत कोसळली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे कला विश्वात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

गोरेगाव फिल्म सिटीत भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Follow us on

मुंबई | 24 फेब्रुवारी 2024 : मुंबईच्या प्रसिद्ध अशा गोरेगाव फिल्म सिटीत आज एक वाईट घटना घडली आहे. फिल्म सिटीत भिंत कोसळल्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या घटनेत एक जण जखमी असल्याचीदेखील माहिती समोर आली आहे. जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत मृत्यू झालेले दोघेजण हे मजूर होते. त्यांच्या अंगावर भिंत कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नेमकी घटना काय घडली? याबाबतची अधिकचा तपशील समजू शकलेला नाही. पण या घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही भिंत अचानक कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे गोरेगाव फिल्म सिटीत मोठमोठे चित्रपट, प्रसद्धी टीव्ही मालिकांचं चित्रीकरण सुरु असतं. असं असताना तिथे अशाप्रकारे भिंत कोसळण्याची घटना समोर आल्यामुळे कला विश्वात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव फिल्म सिटीमधील प्राइम फोकस लिमिटेड येथील इमारतीची भिंत कोसळली आहे. या घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झालाय. संतू मंडल आणि जयदेव मंडल अशी मृतांची नावे असून दोघेही मजूर आहेत. तर विक्रम मंडल हे या दुर्घटनेत बचावले आहेत. पण ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

संबंधित घटना ही आज संध्याकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. तसेच प्रशासनाकडून या घटनेला दुजोरा देण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाचे जवान आता घटनास्थळी तपास करत आहे. संबंधित घटना का घडली किंवा कशी घडली? याचा तपास या जवानांकडून केला जातोय. या घटनेत मृत्यू झालेल्या मजुरांच्या कुटुंबियांना मदत मिळणं अपेक्षित आहे. कारण ते घरातील कर्तेधर्ते होते. प्रशासन याबाबत विचार करतं का, ते लवकरच समोर येईल. पण संबंधित घटनेवर कला विश्वातून दु:ख व्यक्त केलं जात आहे.