आदित्य ठाकरेंच्या प्रत्येक आरोपांना उद्योगमंत्र्यांचं कागदपत्रांसह उत्तर, ‘नाणार’चाही विषय खेचला

| Updated on: Oct 29, 2022 | 6:50 PM

टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी गेल्या सरकारकडून नेमके काय प्रयत्न झाले याचा कागदपत्रांसह पुरावा सादर करा, असं आव्हानच उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंना दिलं.

आदित्य ठाकरेंच्या प्रत्येक आरोपांना उद्योगमंत्र्यांचं कागदपत्रांसह उत्तर, नाणारचाही विषय खेचला
उद्योगमंत्र्यांचं आदित्य ठाकरेंना खुलं आव्हान
Follow us on

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर सडकून टीका केली. राज्यातील वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला स्थलांतरीत होण्यामागे राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या सर्व आरोपांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन कागदपत्रे सादर करत उत्तरे दिली. टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी गेल्या सरकारकडून नेमके काय प्रयत्न झाले याचा कागदपत्रांसह पुरावा सादर करा, असं आव्हानच उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंना दिलं.

“युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी केली आहे. मी राजकीय टीका-टीप्पणी समजू शकतो. पण मी जे सांगितलं होतं, एअरबसबाबत तुमचा टाटा समूहासोबत जो काही पत्रव्यवहार झाला आहे त्याचे पुरावे आपण महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करावे, अशी विनंती मी केली होती. पण तसं काही झालं नाही”, असं उदय सामंत म्हणाले.

“आदित्य ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर मी आता काही कागदपत्रे सादर करतोय. एप्रिल २०२० मध्ये ज्या ठिकाणी विहान प्रकल्प होतोय त्या ठिकाणी पूर्वीपासूनच टाटाची एक कंपनी कार्यरत आहे. त्या टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन एअरबससाठी जागा विहानमध्ये मिळेल का? अशी चौकशी केली होती. माझ्यापेक्षा त्यावेळचे कार्यरत तत्कालीन आयएएस अधिकारी दीपक कपूर हे चांगली माहिती देऊ शकतील. कारण त्यावेळी मी उद्योगमंत्री नव्हतो”, असं सामंत यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

“टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी 2020 मध्ये चौकशी केल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या रेकॉर्डवर कुठेही एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न झाले अशी कोणतीही बैठक आणि पत्रव्यवहार दिसत नाही”, असं सामंत यांनी सांगितलं.

“एक अधिकारी हैदराबादला गेले, ते तिथे कुणाला तरी भेटले आणि त्यांनी हैदराबादमधून आल्यानंतर तत्कालीन मंत्र्यांना सांगितलं की, त्यांनी या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस होते. त्यांनीदेखील हा प्रकल्प नागपूरला होण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली होती. मग त्यावेळी महाराष्ट्र सरकारने काय पुढाकार घेतला, किती बैठका घेतल्या, काय पत्रव्यवहार झाले, मुख्यमंत्र्यांनी कुणासोबत बैठका घेतल्या याची कागदपत्रे आज सामोरे येणे गरजेचे होते”, असं उदय सामंत म्हणाले.

‘एअरबस प्रकल्प नागपुरात येण्याबाबत कोणताही निकाल झाला नव्हता’

“माझ्याकडे आज काही कागदपत्रे आहेत. वेदांता, एअरबस आणि इतर प्रकल्पाची देखील कागदपत्रे आहेत. सरकार गेल्याबद्दल रागू असू शकतो. पण राग किती खोटं बोलून काढायचा, याला काही बंधनं आहेत की नाहीत? म्हणून मी एअरबसच्या बाबतीत सांगितलं की, तो प्रकल्प नागपुरात येण्याबाबत कोणताही निकाल झालेला नव्हता”, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं

“एअरबसच्याबाबत एमआयडीसोबत चर्चा झालेली नव्हती. विहानबाबत चर्चा झाली होती. पण ती स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांची चर्चा झालेली होती. सरकारसोबत चर्चा झालेली नव्हती”, असा खुलासा त्यांनी केला.

उदय सामंत यांनी ‘नाणार’चाही विषय खेचला

“आदित्य ठाकरे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेने कोकणातील एक संभ्रम दूर झाला. माजी मंत्री सुभाष देसाई यांनी नाणारला रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्यानंतर तो प्रकल्प पुन्हा एकदा व्हावा, असं पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलं. आता ही रिफायनरी जर झाली तर ती तुम्ही आणली नाही तर आम्हीच आणली, असं त्यांनी जाहीर केलंय. पण उद्या तिथल्या स्थानिक शिवसेनेच्या खासदारांना रिफायवनरी प्रकल्पाबाबत विचारलं तर त्यांचा आजही त्याला विरोधच आहे. तिथले स्थानिक आमदार रिफायनरी मागत आहेत. रिफायनरीचे अजून पॅकेज जाहीर व्हायचं राहिलं आहे. अनेक गोष्टी व्हायच्या आहेत”, असं म्हणत उदय सामंत यांनी नाणार प्रकल्पाचाही विषय या प्रकरणात खेचला.