मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांच्या अडचणी वाढतच आहे. राजापूरचे आमदार राजन साळवी यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरु आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभव नाईक यांनाही एसीबीची नोटीस आलीय. स्वत: वैभव नाईक यांनीच ही माहिती दिली. या नोटिसांना आम्ही भीक घालत नाही, आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजन साळवी यांची चौकशी
आमदार राजन साळवी यांची तीन दिवसांपुर्वी 6 तास लाचलुचपत कार्यालयात अधिकार्यांनी चौकशी केली होती. यावेळी साळवी यांच्या मालमत्तेबाबत काही कागदपत्र सादर करण्यास विभागाने सांगितले होते. त्यानंतर पुन्हा 22 फेब्रुवारी रोजी उपस्थित राहिले. यावेळी त्यांच्या व कुटुंबीयांच्या मालमत्तेची चौकशी केली होती. आमदार साळवी यांनी सादर केलेली कागदपत्रांबाबत समाधान न झाल्याने इतर कागदपत्रे सादर करण्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना सांगितले होते.
चौकशांना घाबरून पळणार नाही
आता एसीबीची नोटीस आल्यानंतर वैभव नाईक म्हणाले की, लोकांना देखील माहिती आहे या चौकशांना घाबरून लोक तिकडे पळाले आहे. आम्ही 16 आमदार उद्धव ठाकरे यांना भेटून त्यांच्या पाठीशी ठाम असल्याचे त्यांना सांगितलंय. आम्ही अधिवेशनात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा व्हीप मानणार आहे. मग जे काही परिणाम होतील त्यांना आम्ही सामोरे जाऊ, असे त्यांनी सांगितले.
ईडीची नोटीस कधी येते…
नितीन देशमुख यांनी सांगितले की, ईडीची नोटीस कधी येते त्याची वाट आम्ही पाहत आहोत. ACB चौकशीने आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. पण ACB नव्हे तर त्यांनी ईडी चौकशी लावून बघावी, प्रमाणिक शिवसैनिक ईडी, ACB च्या चौकशीला घाबरणार नाही, असे त्यांनी सांगितले.
ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले की, आम्ही सर्व आमदार उद्धव ठाकरे यांना भेटून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा व्हीप पाळणार असल्याचं सांगायला आलो होतो. त्यामुळे अधिवेशनात जे काही होईल, त्याला आम्ही समोरे जाणार आहोत.