मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना शिंदे गटाच्या भरत गोगावले यांची प्रतोद पदाची नियुक्ती रद्द केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांचाच व्हीप लागू होणार आहे, असा दावा शिवसेना नेते अनिल परब यांनी केला. विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा पुन्हा आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जावे लागणार आहे, असे परब यांनी सांगितले. तसेच अध्यक्षांची निवडही बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अजय चौधरी गटनेते
शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना अनिल परब म्हणाले की, सुनील प्रभूंचे व्हिप सर्व सदस्यांना लागू होतात, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदाची निवडही रद्द केली आहे. त्याच्यावर निकालातून शिक्कामोर्तब झाला आहे. अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड कोर्टाने योग्य ठरवली आहे. यामुळे आता विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. त्यांना निकालात दिरंगाई करु नये, कारण सर्व रेकॉर्ड विधानसभा सचिवालयाकडे उपलब्ध आहे. निकालास उशीर झाल्यास आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असे अनिल परब यांनी सांगितले. १५ दिवसांत हा निकाल द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
अध्यक्षांना जावे लागणार
अध्यक्ष ४० अपात्र आमदारांच्या मतांवर निवडून आले आहे. यामुळे ते अवैध आहे. त्यांनाही जावे लागणार आहे, असा दावा अनिल परब यांनी केला.
ठाकरे काय म्हणाले
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. ठाकरे यांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावले यांचं प्रतोदपद रद्द केलं आहे. त्यामुळे माझ्या शिवसेनेचाच व्हीप लागू होणार आहे. अध्यक्षांनी वेडावाकडा निर्णय घेतला तर आम्हाला पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायलयात गेले होतो. त्याचप्रमाणे अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ. मग सरकारची होणारी बदनामीला ते जबाबदार असतील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने जो पोपट ठेवला आहे. तो हालत नाही. निश्चल आहे. तो बोलत नाही हे सांगून तो मेलेला आहे हे जाहीर करण्याचं काम विधानसभा अध्यक्षांकडे दिलं आहे. नार्वेकरांना राजकीय प्रवासाची कल्पना आहे. तो कसा करायचा हे त्यांना चांगलं कळतं. जगात महाराष्ट्राची अवहेलना सुरू आहे. ती अधिक होऊ नये, हीच आमची अपेक्षा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.