‘सिल्व्हर ओक’वर दीड तास खलबतं, पवार-ठाकरे यांच्यात चर्चा काय? आतली बातमी समोर

| Updated on: Sep 12, 2023 | 5:38 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी महत्त्वाच्या आहेत. विशेष म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत.

सिल्व्हर ओकवर दीड तास खलबतं, पवार-ठाकरे यांच्यात चर्चा काय? आतली बातमी समोर
फाईल फोटो
Follow us on

मुंबई | 12 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत आज ‘सिल्व्हर ओक’वर दाखल झाले. यावेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील तिथे उपस्थित होते. यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि जयंत पाटील या चारही नेत्यांमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. विशेष म्हणजे जवळपास दीड तास या चारही नेत्यांमध्ये खलबतं झाली. यावेळी नेमकी काय-काय चर्चा झाली, या विषयाची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

‘सिल्व्हर ओक’वरील बैठकीनंतर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “जागा वाटप लवकरात लवकर पूर्ण करावं. त्यासाठी काँग्रेससोबत चर्चा होणं आवश्यक आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे सर्व मंडळी भविष्यात जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी एकत्रितपणे बसतील”, अशी सूचक प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. त्यानंतर संजय राऊत यांनी महत्त्वाची माहिती दिली.

‘सिल्व्हर ओक’वरील बैठकीत नेमकी खलबतं काय?

“इंडिया आघाडीच्या समन्वयक समितीची उद्या महत्त्वाची बैठक आहे. त्या बैठकीला 13 जणांची समिती उपस्थित राहून तिथे अनेक निर्णय होतील. काही नवीन विषय समोर आलेले आहेत. महाराष्ट्र हे महत्त्वाचं राज्य असल्यामुळे महाविकास आघाडीच्या संदर्भातील काही महत्त्वाचे मुद्दे चर्चेत आले. त्या संदर्भात कोणते विषय घ्यावेत, पुढे जावेत याबाबत चर्चा झाली”, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

“या चर्चेनंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांशी दुरध्वनीवर चर्चा केली. कारण काँग्रेस नेते नाना पटोले आणि इतर नेते त्यांच्या पक्षाच्या एका यात्रेत सहभागी आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत फोनवर चर्चा केली”, असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

“महाराष्ट्रातील अनेक मुद्दे आहेत. महाराष्ट्रात दुष्काळ आहे, मराठा समाजाच्या आंदोलनाला वेगळं वळण घेतलं आहे, सरकार अपयशी आहे. सरकारने विशेष अधिवेशन का बोलावलं आहे या संदर्भात सर्वात जास्त संभ्रम महाराष्ट्रात आहे. नाना पटोले यांनी भूमिका मांडलीय की महाराष्ट्र तोडण्यासाठी हे अधिवेशन आहे. अनेक विषय आहेत. त्यावर चर्चा झाली”, अशी देखील माहिती संजय राऊत यांनी दिली.