मुंबई | दि. 10 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. एकमेकांच्या उमेदवारांना कोंडीत पकडण्याची रणनीती सुरु करण्यात आली. यामध्ये शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आघाडी घेतली. उद्धव ठाकरे यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार धक्का दिला आहे. त्यांच्या पक्षातील खासदाराविरोधात त्यांच्याच मुलाला उमेदवारी दिली आहे. यामुळे मुंबईत बाप विरुद्ध बेटा अशी लढत पाहण्यास मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अमोल कीर्तीकर यांची मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेवदवारी जाहीर केली आहे. सध्या या मतदार संघात गजानन कीर्तीकर हे शिंदे गटाचे खासदार आहेत. त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर आहे. यामुळे या ठिकाणी बाप विरुद्ध बेटा अशी लढत रंगणार आहे. या मतदार संघावर गजानन कीर्तीकर यांचे वर्चस्व आहे. त्यांनी 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडमुकीत काँग्रेसचे गुरुदास कामत यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2019 मध्ये संजय निरुपम यांचा यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व,दिंडोशी,गोरेगाव,वर्सोवा,अंधेरी पश्चिम,अंधेरी पूर्व असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ आहे. त्यापैकी तीन ठिकाणी भाजप आमदार आहेत तर तीन ठाकरे गटाचे आमदार आहे. यामुळे या मतदार संघात दोघांचे पारडे समसमान आहे. आता विद्यामान खासदार गजानन कीर्तीकर यांचे पुत्र असलेले अमोल कीर्तीकर खासदारकीसाठी उभे राहणार आहेत. ते शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वडील एका पक्षात आणि पुत्र दुसऱ्या पक्षात असे चित्र दिसण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केला असला तरी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा पेच अजूनही सुटला नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितमुळे हा पेच निर्माण झाल्याची चर्चा आहे.