मुंबई : जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादाने डोकं वर काढलं आहे. पुंछमध्ये पाच जवान शहीद झाले आहेत. याबाबत 12 लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या हल्ल्यावरून दैनिक सामनातून केंद्रातील भाजप सरकारला घेरण्यात आलं आहे. काश्मिरातील हल्ले अजून सुरूच आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आता बोलावं, असं आव्हानच दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून देण्यात आलं आहे. ईडी आणि सीबीआयला सीमेवर पाठवा. दुश्मन शरणागती पत्करून भाजपमध्ये प्रवेशच करतील, अशी बोचरी टीकाही अग्रलेखातून करण्यात आली आहे.
याच अग्रलेखातून अमित शाह यांना भक्तांचे पोलादी पुरुष म्हणून डिवचले आहे. अमित शाह हे कामाच्या ओझ्याखाली दबून गेल्याचा दावाही करण्यात आला आहे. देशातील सर्व विरोधी पक्षांना मोडून विस्कळीत करायचे आणि भाजपला लोकसभेत विजय मिळवून द्यायचा याची जबाबदारी शाह यांच्याकडेच असल्याचा दावा अग्रलेखातून करण्यात आला आहे. काश्मिरात 370 कलम हटवूनही हिंसाचार थांबलेला नाही. शांतता नांदताना दिसत नाही. काश्मिरी पंडितांच्या घर वापसीचे वचनही हवेत विरले आहे. पाकिस्तानला गोळीनेच उत्तर देऊ असंही मोदी म्हणायचे. आपली छाती 56 इंचाची असल्याचं मोदी म्हणायचे. पण प्रत्यक्षात काश्मीरच्या भूमीवर, लडाख आणि अरुणाचलमध्ये उलटेच घडताना दिसत आहे, अशी टीका दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपर्यंत युद्धाची भाषा बोलत होते. आता बुद्धाची भाषा बोलत आहेत. सत्य सांगायचं तर पाकिस्तानसमोर ते युद्धाची भाषा करतात. पण चीनच्या आक्रमणापुढे त्यांना बुद्ध आठवतो. भारताची संस्कृती अतिथी देवो भवची आहे. लडाख, अरुणाचलमध्ये घुसलेले आणि काश्मिरात घुसून आपल्या जवानांवर हल्ले करणारे अतिथीच आहेत असे मानावे काय? असा सवाल करतानाच देशाला मजबूत पंतप्रधान आणि कणखर गृहमंत्री लाभलेले असताना जवानांवर अतिरेकी नामक अतिथीं हल्ले करतातच कसे? असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे.
ईडी, सीबीआय आणि आयकर ही मोदी आणि शाह यांची शस्त्रे आहेत. पण त्यांना चिनी आणि पाकिस्तानी अतिथी घाबरतात असं दिसत नाही. जम्मू-काश्मीरचे विभाजन केले. त्यांचा पूर्ण राज्याचा दर्जा काढला. चार वर्ष झाली. पण अजूनही केंद्र सरकार तिथे निवडणुका घ्यायला घाबरत आहे. निवडणुकांशिवायच राज्य करण्याचं काम सुरू आहे, अशी टीका करतानाच काल काश्मीरमध्ये हल्ला झाला. मोदी त्यावर तरी काही बोलतील का? युद्धाची भाषा नको, बुद्धाची भाषा नको, निदान प्रतिकाराची भाषा तरी करा. नाही तर सीमेवर हत्यारबंद ईडी, सीबीआयला पाठवा. काय सांगावं, दुश्मन शरणागती पत्करून भाजपमध्ये प्रवेशच करतील, अशी बोचरी टीकाही करण्यात आली आहे.