Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवरुन मोठा गौप्यस्फोट केला आहे. अमित शाह यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. त्याचवेळी फडणवीसांनी आदित्यला मुख्यमंत्री करुन दिल्लीला जाणार असं म्हटलं होतं. असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तर उद्धव ठाकरेंना वेड लागल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
अमित शाहांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला. आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करुन मी दिल्लीत जाणार असं स्वत: फडणवीसच म्हणाले होते, असा दावा उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मी माझ्या वडिलांना वचन दिलं होतं की शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार. भाजपनं मलाच माझ्या लोकांसमोर खोटं पाडलं.
आतापर्यंत अमित शाह आणि अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद एवढंच, पुढं आलं होतं. पण प्रथमच उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाचा उल्लेख केला आहे. त्यासाठी फडणवीसांचं नाव घेतलं. आता आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदावरुन स्वत: उद्धव ठाकरेंनीच दावा केल्यानं, भाजपनं ठाकरेंच्या मनातलं चांदणं समोर आल्याची टीका केली आहे.
2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीआधी अमित शाह मातोश्रीवर आले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत शाहांनी आपल्याला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिल्याचं ठाकरेंचं म्हणणं आहे. त्या खोलीत अमित शाह आणि उद्धव ठाकरे हे दोघेच होते. हेही आतापर्यंत सांगण्यात आलं. तर TV9च्या कॉनक्लेव्हमध्ये फडणवीसांनीही ठाकरेंचा हा दावा फेटाळून लावला होता.
याच अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदावरुन विधानसभेच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेनेचं फिस्कटलं आणि ठाकरेंनी कट्टर विरोधी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी निर्माण केली. पण त्यानंतर ते स्वत:च मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे यांनी त्याच मुलाखतीत, बाळासाहेब हयात नसल्याचं पाहून शिवसेनेला कसं दाबण्याचा प्रयत्न झाला हेही सांगण्याचा प्रयत्न केला.
2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यावर स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं. अमित शाह भाजपचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची चालच बदलली. 2014 च्या निवडणुकीआधी त्यांनी मला विचारलं की सर्व्हे केला आहे का ?, मी म्हटलं आम्ही लढणारी माणसं आहोत, सर्व्हे करत नाहीत. शिवाजी महाराजांनी सर्व्हे केला नव्हता. जर सर्व्हेत तुमचा पराभव दाखवला तर तुम्ही लढणंच सोडून देता का? सुरुवातीला त्यांनी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी वाटाघाटी करण्यासाठी यायचे. जागांची चढाओढ व्हायची. पण आता उर्मटपणा व आकड्यांचा वापर सुरु केला. त्यांनी राजस्थानमधले भाजपा नेते ओम माथूर यांना आमच्याशी चर्चा करायला पाठवलं. भाजपाला वाटलं आता बाळासाहेब नाहीत, तर हल्ला करायची हीच वेळ आहे. वापरा आणि फेकून द्या ही त्यांची गॅरंटी आहे. तेच भाजपनं 2019मध्ये माझ्यासोबत केलं.
2019 मध्ये भाजपसोबतच्या घडामोडीत मुख्यमंत्रिपद आणि त्यातही आता आदित्य ठाकरेंचं नाव उद्धव ठाकरेंकडून समोर आलं आहे. अर्थात भाजपनं हा दावा फेटाळत ठाकरे खोटं बोलत असल्याचं म्हटलं. म्हणजेच, निवडणूक लोकसभेची असली तरी भाजप कसा धोका दिला हेच दाखवण्याचा प्रयत्न ठाकरेंचा आहे.