शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं कामकाज कुठपर्यंत झालं हे पाहण्यासाठी स्मारकस्थळी भेट दिली. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या कामकाजाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात काम सुरु होईल. या दोन्ही टप्प्यांचं कामकाज 23 जानेवारी 2026 च्या आधी पूर्ण होईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या उद्घाटनावेळी कोण-कोण येईल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी त्यावेळी जे पंतप्रधान असतील त्यांच्या हस्ते स्मारकाचं उद्घाटन होईल, असं उत्तर दिलं. यानंतर त्यांनी आणखी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. ‘राजकारणात उद्या काय होईल ते सांगता येईल का?’, असं वक्तव्य त्यांनी केलं.
“त्यावेळी जे पंतप्रधान असतील ते उद्घाटनाला येतील”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी पत्रकारांनी त्यांना कोण पंतप्रधान असतील? असं विचारलं. त्यावर त्यांनी “उद्या काय होईल हे आज सांगता येत नाही. एनडीएचं सरकार असेल तर ते लोक येऊ शकतात. त्यावेळी जे सरकार असेल ते लोक येतील. भूमिपूजनाच्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. आता नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकात आपलं स्वागत करताना आनंद होतोय. या स्मारकावर काम सुरु आहे आणि चर्चादेखील सुरु आहेत. मी आर्किटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट यांना धन्यवाद देऊ इच्छितो. हे काम आता फार सोपं वाटतंय. पण करताना फार कठीण होतं. माजी मंत्री सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांनी या जागेचं महत्त्व सांगितलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्मारकही बाजूलाच आहे. पण या जागेतला आव्हान म्हणजे, एक महापौर बंगला. या बंगल्याला आम्ही केवळ वास्तू म्हणून बघत नाहीत तर त्या वास्तू बरोबर आम्ही एक भावनात्मक बंधनासह जोडले गेलो आहोत, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
“आताच इथे शिवसेनेचे चार महापौर या वास्तूत राहिले होते. ते आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक बैठका इथे झाल्या आहेत. महायुतीच्या बैठका इथे झालेल्या आहेत. ही वास्तू हेरीटेज वास्तू आहे. या वास्तूला कुठेही धक्का न लावता काम करणं खूप कठीण होतं. त्या वास्तूचं वैभव जपून काम करणं हे फार कठीण होतं. हेरीटेद म्हटल्यावर काही नियम असतात. त्यामुळे सीआरझेडचा कायदा आला”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“मग आम्ही असं ठरवलं, ही कल्पना आर्किटेक्ट आभा लांबा यांची आहे. स्मारक भूमिगत करुयात. हे बोलायला खूप सोपं आहे. बाजूला समुद्र आहे. त्या समुद्राचा रेटा हा जमिनीखालून ही खूप असतो. काही वर्षांपूर्वी इथे आपण संयुक्त महाराष्ट्राचं दालन केलं. पण ते दालन झाल्यानंतरही तिकडे रिपेअरिंग करायची गरज लागली. कारण समुद्राचं पाणी जमिनीखालून सर्व मर्यादा ओलांडून येत होतं. त्यामुळे ती खबरदारी घेणं, त्यानंतर ती वास्तू उभी करणं हे आव्हानाचं होतं. त्यामुळे मी आर्किटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट्स यांचा आभारी आहे. त्यांनी अत्यंत देखणं काम वेळेमध्ये टप्पा 1 पूर्ण केलेला आहे”, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
“टप्पा 2 च्या कामाला आता सुरुवात होईल. या कामातून संपूर्ण शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट बघायला मिळणार आहे. अर्थात तो मुक्त असा जीवनपट नाही. शिवसेनाप्रमुखांनी कधी आत्मचरित्र लिहिलं नाही. त्यांना अनेकदा विचारलं की तुम्ही आत्मचरित्र का लिहित नाहीत, त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं की, मी कपाटातला माणूस नाही. मी मैदानावरचा माणूस आहे. त्यामुळे त्यांचं आयुष्य उघडं पुस्तक होतं. पण ते नुस्त मांडणं म्हणजे स्मारक नाही. मी असा विचार केला की, शिवसेनाप्रमुखांचं स्मारक असं झालं पाहिजे की, जे शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर महाराष्ट्राला, देशाला आणि देशातील हिंदूंना दिलं, तेच काम त्यांच्या स्मारकाने सुद्धा पुढचे अनेक वर्ष दिलं पाहिजे”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.