निवृत्ती बाबर, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 11 फेब्रुवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाषणंत मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षात मोठी फूट पडलीय. पण एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या सर्वाधिक लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याने त्यांच्या बाजूने सर्व कायदेशीर निकाल लागले. पक्षात घडलेल्या या सर्व घटनांनंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांनी पुन्हा महत्त्वाचं आवाहन केलं आहे. ‘आधीच भेकडं शिंदेकडे गेलेत, आणखी काही असतील त्यांनीही जावं’, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. “संघाबाबत मला आदर आहे, त्यांनी कुटुंबावर निखारे ठेवून वेळप्रसंगी मार खावून, शिव्या खावून काम केलंय. आज जे काही सुरू आहे, याचसाठी केला होता का अट्टहास? भारतमाता वाचवायची असेल तर जिद्धीने उभं रहायला हवं. आधीच भेकडं शिंदेकडे गेलेत. आणखी काही असतील त्यांनीही जावं, मी मूठभर शिवसैनिकांना घेऊन पुढे जाईन”, असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
“गुंडागर्दीही जर राज्यकर्ते थांबवू शकत नाही तर मग त्याला खुर्चीत बसायचा अधिकार नाही. आज जर आम्ही चुकलो तर आमच्यावर टीका जरुर करा. पण कुठे चुकलो हेही सांगा. आपण अनेकांना पक्षात घेतलं. पण कोणाच्या पक्षाच्या मूळावर उठलो नाहीत. जिंकल्यानंतर समोरच्याला ठेचणं ही वृत्ती योग्य नाही. हे यांच्या मित्रपक्षाला संपवत आहेत. हे मी नाही गडकरी बोलत आहेत. सध्या पक्षात त्यांनाच स्थान राहीलं नाही”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
“आमच्या घराणेशाहीवर बोलता तर बोला. माझी घराणेशाही वाईट काय? आमच्या घराणेशाहीला विरोध असेल तर तुमच्या एकाधिकारशाहीला ही आमचा विरोध आहे. आपल्याकडे भाजप एवढे पैसे नाहीत. मात्र सोन्यासारखी माणसं आहेत. अनेक ठिकाणी मुस्लिम समाज आपल्यासोबत येतोय. मी त्यांना बोलतो मी कडवट हिंदू आहे. त्यावेळी ते म्हणतात तुमचं आणि भाजपच्या हिंदुत्वात फरक आहे. माणसाने धर्म घडवलाय, धर्माने माणून बिघडवू नका”, असं ठाकरे म्हणाले.
“अनेक वर्षानंतर लोकाधिकारचं शिबिर होतंय. घरी बोलत होतो तेव्हा कळलं की काही शिवसैनिक माझ्यापेक्षा मोठे आहेत. अनिल माझ्यापेक्षा मोठा आहे. पण अरेतुरे करतो. त्यामध्ये मोठा जिव्हाळा आहे. शिवसेनेवर आरोप केला जातो, हुकूमशाही वैगेरे म्हटलं जातंय. सध्या जे काही सुरूय ते ओरबाडणं सुरु आहे. अनेकवेळा असं होत की क्रिकेटच्या मैदानात शतक वैगेरे मारून जातात तसं मी आता त्यानंतर आलोय. 56 वर्षात शिवसेनेने वादळ नाही पाहिलं असं नाही. काहींना शिवसेनेला उपटायची फिरफिरी आलेली आहे. पण त्यांना काही माहिती नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“भारतरत्न कोणाला द्यायचा किती द्यायचा याचं एक सूत्र होतं. पण आता आले मोदीजींच्या मना… जेव्हा ती लोक होती तेव्हा त्यांना विरोध केला. तेव्हाचे दिवस होते तेव्हा त्यांना शिव्या दिल्या. आता तुम्हाला बिहारमध्ये मत पाहिजे म्हणून करपूरी ठाकूर यांना भारतरत्न देताय. स्वामीनाथन यांना राष्ट्रपती करा, अशी मागणी आम्ही पहिली केली होती. येत्या काही दिवसांत आणखी काही भारतरत्न जाहीर करतील. काहींना वाटतं की पुरस्कार जाहीर केला तर प्रदेशच्या प्रदेश आपल्या मागे येतील. पण असं होणार नाही”, असं ठाकरे म्हणाले.
“आजची बातमी वाचली की 1300 कोटी रुपये भारतीय जनता पार्टीला मिळाले आहेत. सध्या दक्षिणेतल्या राज्यांनी दिल्लीत आंदोलन केली. मोदी गॅरेंटी हे म्हणतात. त्यामध्ये महाराष्ट्राचा हिस्सा आहे. जो रुपया केंद्र सरकारला देतो त्यातील अर्धा रुपया आम्हाला मिळाला पाहिजे. ही आमची मागणी असणार आहे. आता किती ऑफिस मुंबईत आहेत, किती कार्यालय आहेत, मोर्चे काढायचे कुठे? आम्हाला आमच्या राज्याच्या हक्काचा पैसा पाहिजे आणि जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा कायदा केल्याशिवाय गप्प बसणार नाही”, असं ठाकरे म्हणाले.
“नेहरूंनी काय-काय केलं हे कायम सांगत आहात. त्यांच्यापेक्षा जास्त कालावधी तुम्ही सत्ता उपभोगली आहे. नेहरू 16 वर्ष सत्ता करत होते. पण तुम्ही स्वतः 10 वर्ष सलग सत्तेत आहात. तसेच अटलजी होते तेव्हा तुम्ही का काही केलं नाही?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.