महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. महायुती अन् महाविकास आघाडीत जागा वाटपांवर चर्चा होत आहे. यावेळी राज्यातील राजकारणाची दिशा बदलणारी बातमी आली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट झाली आहे. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत भेटले असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी एक्सवर व्हिडिओ ट्विट करत केला आहे. अद्याप या दाव्यावर ठाकरे गट किंवा भाजपकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही.
वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे की, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत २५ जुलै रोजी नवी दिल्लीत जे.पी.नड्डा यांना भेटले. २५ जुलै रोजी रात्री दोन वाजता ७ डी मोतीलाल मार्गावर ही भेट झाली. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे स्वतः गाडी चालवत एकटेच उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर पोहचले. रात्री १२ वाजता मातोश्रीवर गेल्यावर त्या दोन्ही नेत्यांमध्ये दोन तास चर्चा झाली. त्यानंतर ६ ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे दिल्ली जाऊन पोहचले. दिल्लीला जाताना त्यांच्या सोबत कोण कोण होते, दिल्लीत त्यांनी कोणाकोणाच्या भेटी घेतल्या? त्या भेटीत काय काय ठरले, हे जनतेला सांगावे, असे सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे.
भाजप आणि शिवसेना उबाठा यांच्यातील या गाठीभेटींचा गौप्यस्फोट का केला, त्याचे कारण सांगताना सिद्धार्थ मोकळे म्हणाले, राज्यातील आरक्षणवादी मतदारांना भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष हे आरक्षणविरोधी असल्याचे माहिती आहे. परंतु या आरक्षण समर्थक लोकांनी उद्धव ठाकरे यांना मतदान केले आहे. राज्यातील राजकारणात गेल्या पाच वर्षात अनेक घडामोडी घडल्या आहे. यामुळे राज्यातील आरक्षणवादी मतदारांची फसवणूक होऊ नये, यासाठी ही माहिती समोर आणल्याचा दावा त्यांनी केला आहे.
संजय राऊत – जे. पी. नड्डा यांची गुप्त भेट
आरक्षणवादी मतदारांनो सावधान#VBAForMaharashtra #VoteForVBA #Reservation #VBAForIndia pic.twitter.com/0RYBJjm3W9— Siddharth Mokle (@siddharthmokle) September 30, 2024
नाशिकमध्ये बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, सिद्धार्थ मोकळे यांच्याकडे काही माहिती असेल. ती माहिती त्यांनी जनतेसमोर आणली आहे. मागील निवडणुकीत संविधान आणि आरक्षणवादी मतदारांची फसवणूक झाली आहे. ती फसवणूक पुन्हा होऊ नये म्हणून त्यांनी ही माहिती सांगितल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.