मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना दादरमध्ये सेनाभवनासमोरील राड्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय. “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक भाषण व्हायरल होत आहे. त्यात ते त्याचा फटकन आवाज आला तर आपला काडकन आवाज आला पाहिजे असं सांगत आहेत. हे का व्हायरल होतंय हे ज्याचं त्याला माहिती आहे. यालाच शिवसैनिक म्हणतात,” असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं (Uddhav Thackeray Fighting between BJP Shivsena in Dadar Sena Bhavan on Ram Temple).
उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेना प्रमुखांचं जुनं भाषण व्हायरल होतंय. त्यातलं एक वाक्य ‘त्याचा फटकन आवाज आला, तर आपला काडकन आवाज आला पाहिजे’. हे भाषण दोन दिवसापासून सगळीकडे का व्हायरल होत आहे हे ज्याचं त्याला माहिती आहे. याला म्हणतात शिवसैनिक. ही शिवसैनिकाची ओळख आहे. असं असलं तरी फक्त हाणामाऱ्या करणं, खुनखराबा करणं हे आपलं काम नाही. रक्तपात करणं हा शिवसैनिकाचा गुणधर्म नाही. अन्यायावर वार करणारा शिवसैनिक रक्तपात करणारा नाही. पण ही ओळख जर कुणी मुद्दाम करुन देत असेल, तर रक्तदान करणाऱ्या शिवसैनिकांची ओळख अनेकांना आहे.”
“1992-93 मध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरला नसता तर मुंबई वाचली नसती. हे त्रिवार सत्य आहे, पण त्याचबरोबर रक्तदान करणारे शिवसैनिक ही देखील शिवसेनेची ओळख आहे. आरोप करणाऱ्या किती जणांची अशी ओळख आहे हे पहिल्यांदी त्यांनी मला सांगावं. बदनामी करणारे बदनामी करत आहेत. राजकारणाचं विदृपीकरण सुरू आहे. आरोप करायचं आणि पळून जायचं असं सुरू आहे. आरोप करणाऱ्यांनी स्वतःचे चेहरे आरशात पाहिले आहेत का? ते कोण आहेत, त्यांचं सर्व चारित्र्य स्वच्छ आहेत का?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केला.
“ज्या ज्या वेळी रक्तदान करण्याची वेळ येते, त्यावेळी शिवसैनिक सर्वात आधी पुढे येतो. तेव्हा हे रक्त मराठी माणसाला जाणार आहे की हिंदूंना जाणार आहे का हा विचार तो करत नाही. हे आमचं हिंदुत्व आहे, हे आमचं राष्ट्रीयत्व आहे. आमचं रक्तदान सर्वधर्मीयांसाठी आहे,” असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.
Uddhav Thackeray Fighting between BJP Shivsena in Dadar Sena Bhavan on Ram Temple