मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दसरा हा सण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी राजकीय घडामोडी देखील जोरदार घडतात. महाराष्ट्रात बीडमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा दुपारी पार पडतो. तर संध्याकाळी शिवसेनाचा मोठा दसरा मेळावा मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर पार पडतो. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला खूप महत्त्व आहे. पण सध्या शिवसेनेत फूट पडलीय. शिवसेना दोन गटात विभागली गेलीय. त्यामुळे शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा कुणाचा होणार? याकडे अनेकांचं लक्ष आहे.
विशेष म्हणजे हा प्रश्न गेल्यावेळी देखील उपस्थित झाला होता. पण ठाकरे गटाला मुंबई हायकोर्टाकडून परवानगी मिळाली होती. त्यानंतर यावर्षी देखील शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून मुंबई महापालिकेत दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाबाबत अर्ज करण्यात आला होता. दोन्ही गटाकडून शिवाजी पार्क येथेच दसरा मेळावा घेतला जाईल, असा दावा केला जात होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने वाद टाळण्यासाठी शिवाजी पार्क मैदानाऐवजी दुसरीकडे दसरा मेळावा घेण्याचं ठरवल्याचं आमदार सदा सरवणकर यांनी सांगितलंय. त्यामुळे ठाकरे गटासाठी शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्याचा मार्ग मोकळा झालाय.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी आज शेकडो वासुदेव आणि नंदीबैलवाले आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक गोड बातमी दिली. दसरा मेळावा कुठे होणार? कुठल्या मैदानावर होणार? याबाबत कार्यकर्त्यांचा मनात धाकधूक होती. कारण शिंदे गटाने देखील या मैदानावर दावा केला होता. पण अखेर उद्धव ठाकरे यांनी याबाबत गुडन्यूज आपल्या कार्यकर्त्यांना दिली.
आपला दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. “शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा अशी 57 वर्षांची परंपरा आहे. ही पंरपरा कायम राहिलेली आहे. यावर्षीसुद्धा विजयादशमीचा दसरा मेळावा वाजतगाजत, उत्सहाने शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावरच होणार आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.