खासदार संजय राऊत यांनी आज राज्य सरकारच्या दुटप्पी धोरणाचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. चिल्लर प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर हे कुणाच्या आशीर्वादाने बाहेर फिरतायेत असा खडा सवाल त्यांनी केला. त्यांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेत तुफान फटकेबाजी केली. अबू आझमी मुस्लिम असल्याने त्यांना टार्गेट करणे सोपे होते, पण कोरटकर, सोलापूरकर आणि भैय्याजी जोशी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे. त्यांनी मराठी भाषेवरील भैय्याजींच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. हे वक्तव्य म्हणजे एकप्रकारे लिटमस टेस्ट असल्याचे संकेत त्यांनी दिले. राऊत काय म्हणाले?
कोरटकर कसा बाहेर फिरतोय?
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा हा प्रशांत करोटकर अपमान करतो. त्याचे केंद्रीय नेत्यांपासून तर राज्यातील आयएएस, आयपीएस अधिकारी, नेत्यांपर्यंत उठबस आहे. तो कुणाच्या आशीर्वादाने बाहेर फिरतोय अशी विचारणा राऊतांनी केली. त्यांनी महायुती सरकारच्या कारवाईवरच थेट शंका उपस्थित केली.
राहुल सोलापूरकर हा छत्रपती शिवाजी महाराज हे भ्रष्टाचार करून आग्र्यातून सुटले असा धादांत खोटा बोलतो. थाप मारतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या शिताफीने आग्र्यातून सुटका करून घेतली असताना हा सोलापूरकर खोटा इतिहास सांगतो. पण या दोघांवरही कारवाई होत नाही. समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांच्यावर तातडीने कारवाई केली. ते सोप होतं कारण ते मुस्लीम होते. पण येथे दोघांवर कारवाई होत नाही कारण ते संघाचे आहे, असा घणाघात राऊतांनी घातला.
भैय्याजी जोशींचा निषेध केला का?
मराठी ही काही मुंबईची भाषा नाही, घाटकोपरची गुजराती, तर त्या त्या भागात विविध भाषा बोलली जाते, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी म्हणाले होते. त्यावरून वाद झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यावर आज राऊतांनी वरमी घाव घातला. मराठी ही मुंबईची भाषा नाही, असे भैय्याजी जोशी म्हणाले. त्यावर मराठी हीच राज्याची भाषा आहे, असे थातुरमातूर उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पण त्यांनी जोशींचा निषेध केला का? असा खडा सवाल संजय राऊत यांनी केला.
भैय्याजी जोशी यांचे हे वक्तव्य साधं नाही. तर ही भाजपची समजून उमजून खेळलेली चाल, रणनीती असल्याचा दावा राऊतांनी केला. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून मुद्दामहून अशी वक्तव्य करण्यात येत असल्याकडे राऊतांनी माध्यमांचं लक्ष वेधले. जोशी हे संघाचे ज्येष्ठ नेते आहे. संघाचा व्यक्ती जेव्हा बोलतो, तेव्हा तो सहज बोलत नसल्याचे सुतोवाच राऊतांनी केले.