मुंबई, दि. 9 जानेवारी 2024 | शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकाल बुधवारी येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालाचे काम जवळपास पूर्ण केले आहे. या निकालापूर्वी लवाद म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी झाली. या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला आहे. दोन वेळा झालेली ही भेट म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात हे निर्देशनास आणून दिले आहे. आम्ही कालच यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. परंतु जनतेच्या न्यायालयातही ही लक्षात आणून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. उद्या वेडावाकडा निकाल आला तर…या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.
लवादाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या रात्रीपर्यंत निकालासाठी वेळ घेतील. कदाचित त्यापेक्षा जास्त वेळ ते काढतील. ते लवाद म्हणून बसले आहेत. परंतु दोन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटले. हा प्रकार म्हणजे न्यायामूर्ती आरोपींना जाऊन भेटण्यासारखा हा प्रकार आहे. आम्ही काल ताबडतोब हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्दशनास ही बाब लक्षात आणून दिली आहे. यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. न्यायामूर्तीच्या भूमिकेत नार्वेकर आहेत आणि आरोपी असलेले एकनाथ शिंदे त्यांना भेटले आहे. आम्ही एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे आमच्या दृष्टीने ते आरोपी आहेत. खटला सुरु असताना आरोपी आणि न्यायामूर्ती यांची उघड उघड भेट होत आहेत. हा लोकशाहीचा खून होत आहे. आमची अपेक्षा आता सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. परंतु जनतेच्या न्यायालयात ही बाब आम्ही लक्षात आणून देऊ इच्छता.
उद्धव ठाकरे म्हणाले की, एका मुलाखतीत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट म्हणतात, ‘हा वेळ काढूपणा आहे किंवा अध्यक्षांवर दबाब असेल किंवा ते या प्रकरणात इतके कार्यक्षम नसतील. दोन महिन्यात लागणाऱ्या निकालासाठी त्यांनी दोन वर्ष घेतले.’ राज्यातील जनतेच्या लक्षात ही बाब आम्ही आणून देऊ इच्छितो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.