‘आश्वासनांची अतिवृष्टी, थापांचा महापूर’, महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे यांची खोचक प्रतिक्रिया

| Updated on: Jun 28, 2024 | 4:19 PM

"आजचा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती. थापांचा महापूर आहे. त्यामध्ये सगळ्याच घटकांना आपल्यासोबत जोडून न्यायचा, ज्याला देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दांत सांगायचं तर खोटं नरेटिव्ह म्हणतात, असं अर्थसंकल्पाचं वर्णन करावं लागेल", अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

आश्वासनांची अतिवृष्टी, थापांचा महापूर, महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे यांची खोचक प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे
Follow us on

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. अजित पवार यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा अश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली. “गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या आश्वासन आणि थापांना कंटाळून चिडलेल्या महाराष्ट्राने जो काही त्यांना दणका दिला त्याने सत्ताधाऱ्यांचे डोळे थोडेसे किलकिले झालेले दिसत आहेत. तरीदेखील जनता त्यांच्या थापांवर विश्वास ठेवेल, असं मला वाटत नाही. महाराष्ट्रातील जनता ही सुजाण, सज्ञान आणि स्वाभिमानी आहे. कितीही फसवण्याचा प्रयत्न केला, तरीदेखील महाराष्ट्र ओरबाडून गुजरातला नेण्याचं षडयंत्र हे उघड झालं आहे. महाराष्ट्र गुजरातच्या पाठी गेलेलं आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“यांचा प्रयत्न हाच आहे की, काहीतरी धुळफेक करायची, जनतेला फसावयचं आणि रेटून खोटं बोलायचं, पुन्हा सरकार आणून महाराष्ट्राला लुबाळायचं. निवडणूक जवळ आल्यानंतर अशा प्रकारच्या घोषणा केल्या जातात. आजचा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती. थापांचा महापूर आहे. त्यामध्ये सगळ्याच घटकांना आपल्यासोबत जोडून न्यायचा, ज्याला देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दांत सांगायचं तर खोटं नरेटिव्ह म्हणतात, असं अर्थसंकल्पाचं वर्णन करावं लागेल. अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद कशी करणार, याबाबत कुठेही उल्लेख नाही”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

‘मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करु नका’

“आमची मागणी आहे की, त्यांनी गेल्या दोन वर्षांत आजपर्यंत ज्या घोषणा केल्या त्या खरोखर किती अंमलात आणल्या याबद्दल तज्ज्ञांची कमिटी नेमून श्वेतपत्रिका जाहीर करावी. अनेक योजना अशा आहेत की, ज्या घोषित झाल्या पण प्रत्यक्षात आल्या नाहीत. या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट असं की, महिलांना जरा मतदानात आपल्या बाजूने करुन घेण्याचा केविलवाना प्रयत्न दिसत आहे. महिलांसाठी लाडकी लेक आणि लाडकी बहीण या योजना आणत असाल तर जरुर आणा. पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करु नका. मुलींसाठी काही आणत असाल तर मुलांसाठीदेखील काही आणा. त्याबद्दल कुठे वाच्यता नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘शेतकऱ्यांची थकबाकी माफ करणार आहात का?’

“माता-भगिणींना जे देताय ते जरुर द्या. पण त्याचवेळेला एक सांगेल, या देशात हजारो तरुण बेकार असताना घरी गेल्यानंतर ती माता-बघिणी त्याला काय उत्तर देणार, या प्रश्नाचं उत्तर या अर्थसंकल्पात कुठेच दिसत नाही. रोजगार वाढीसाठी कुठेच उपाययोजना नाही. शेतकऱ्यांना वीजबिल माफ करा, ही मागणी मी केली होती. ती त्यांनी माफ केली. पण शेतकर्‍यांना कर्जमुक्त करा ही मागणी त्यांनी मान्य केलेली नाही. शेतकऱ्यांना वीजबिल माफ केल्यानंतर शेतकऱ्यांची थकबाकी माफ करणार आहात का?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.