मुंबई | 2 सप्टेंबर 2023 : जालन्यात काल मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या या अमानुष आणि बेछुट गोळीबारामुळे मराठा समाज चांगलाच खवळला आहे. या लाठीहल्ल्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. आज राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने केली जात असून काही ठिकाणी बंदही पुकारण्यात आला आहे. विरोधकांनी या हल्ल्यावरून भाजपला चांगलंच घेरलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या हल्ल्याचा निषेध करत भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्यात एक फूल दोन हाफ आहेत. त्यांना आंदोलनाची माहिती नव्हती काय? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे हे पदाधिकाऱ्यांशी बोलत होते. सरकारमध्ये एक फूल दोन हाफ आहेत. या एक फूल दोन हाफला आंदोलन सुरु असल्याची माहिती नव्हती का? मी मुख्यमंत्री असताना रोज कुठे काय सुरू आहे याची माहिती मला दिली जायची. गृहमंत्र्यांना तर अशा आंदोलनाची माहिती असतेच असते. मग यांना माहीत नव्हती काय? असा सवाल करतानाच जालन्यात कार्यक्रम घ्यायचा होता म्हणून मराठा आरक्षण मोडीत काढल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
बारसूतही असाच लाठीमार झाला होता. त्यावेळी मी बारसूला गेलो होतो. आंदोलकांची भेट घेतली होती. जालन्यात आंदोलकांवर लाठी हल्ला झाला. पण यांचा एक मंत्रीही तिकडे फिरकला नाही. पोलीस तुमच्या घरी आम्ही तुमच्या दारी, असा प्रकार राज्यात सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.
दिल्लीतील अधिकार दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या हाती जावू नये म्हणून केंद्र सरकारने विधेयक आणलं. सर्व अधिकार आपल्या हाती घेतले. मग विशेष अधिवेशनात वटहकूम काढून आरक्षणाचा मुद्दा निकाली काढा. मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. विशेष अधिवेशनात आरक्षणाचा मुद्दा निकाली काढा, असं सांगतानाच इंडिया आघाडीवर टीका करायला वेळ पण आंदोलनाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला.
या सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं आहे. गणपतीत विशेष अधिवेशन बोलावलं आहे. 2012मध्ये त्यांनी गणपतीत भारतबंद पुकारला होता. आम्हाला बंदमध्ये सहभागी होण्यास सांगितलं होतं. पण बाळासाहेबांनी स्पष्टपणे नकार दिला. गणपतीत भारत बंद कसला करताय असा सवाल बाळासाहेबांनी केला होता. त्यामुळे आम्ही त्यावेळी भारत बंदमध्ये सहभागी झालो नव्हतो. आताही त्यांनी गणपतीत अधिवेशन बोलावलं आहे. आमच्या सण उत्सवाच्या वेळी हे अधिवेशन होत आहे, असं सांगतानाच डिसेंबरमध्ये भाजपने देशातील सर्व विमानं बुक केली आहेत. निवडणुका झाल्या तर काय करायचं? असा सवाल त्यांनी केला.