मुंबई: अदानी समूहाच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला बगल देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत गुलाल, चिखल आणि कमळाचा उल्लेख करत विरोधकांवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भाषणावर आजच्या दैनिक ‘सामना’तून टीका करण्यात आली आहे. तुमचेही पाय चिखलाचेच आहेत हे विसरू नका, असा इशाराच दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपला दिला आहे. तुमचेही पाय चिखलाचेच आहेत. हे गमक विसरू नका. तुम्ही विसरलात तरी जनता त्याची आठवण योग्यवेळी तुम्हाला करून देईलच, असं ‘सामना’ने म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर भाष्य केलं. त्यात त्यांनी अदानीचा अ देखील उच्चारला नाही. संसदेच्या दोन्ही सभागृहात त्यांनी अदानीच्या भ्रष्टाचारावर मौन पाळलं. मात्र, काँग्रेस पक्ष आणि गांधी-नेहरू घराण्यावर टीका केली. त्यांनी शायराना अंदाजात ही टीका केली. त्यावर सत्ताधाऱ्यांनी बाकेही वाजवली. पण या भाषणातील यमका पलिकडील गमकाचे काय? असा सवाल ‘सामना’तून करण्यात आला आहे.
चिखल, कमळ, गुलाल हे यमक जुळवायला, बोलायला आणि टाळ्या वाजवायला ठीक आहे. पण तुम्ही काँग्रेस आणि गांधी-नेहरू घराण्याविषयी बोलला ते काय होते? तुमच्याजवळही चिखल होता आणि तोच तुम्ही फेकला, अशी टीकाही अग्रलेखातून करण्यात आली आहे.
कोणत्या तरी परदेशी विद्यापीठात काँग्रेसबाबत संशोधन झालं. त्याचा तुम्ही उल्लेख केला. तो कोणत्या गुलालाचा प्रकार होता? अनेक पिढ्यांनी भारताची उभारणी केल्याचं सांगायचं आणि काँग्रेसने देशाचं वाटोळं केलं असंही म्हणायचं हा कोणत्या चिखलाचा प्रकार होता? नेहरू महान होते म्हणायचे आणि त्यांचे अडनाव का लावत नाही म्हणून नेहरू-गांधी घराण्याला डिवचायचे हा कोणता गुलाल होता? असे सवालही करण्यात आले आहेत.
राजकीय विरोधक म्हणजे शत्रू, सरकारचे टीकाकार म्हणजे देशद्रोही असे एक नरेटिव्ह तयार करण्यात आले आहे. त्यामुळेच मोदींना विरोधकांची टीका हा चिखल वाटत आहे. पण गेल्या आठ वर्षात मोदींनी विरोधकांवर कोणता गुलाल उधळलाय?
2014च्या लोकसभा निवडणुकीपासून भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांची सुरू असलेली हेटाळणी, अपमान, उपमर्द याला चिखल नाही म्हणायचे काय? असा सवालही अग्रलेखातून करण्यात आला आहे.