थोरांचा महाराष्ट्र झाला चोरांचा, अंध भक्तांची पैदास वाढली; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

| Updated on: Nov 07, 2023 | 3:46 PM

लोकांनी मद्य प्यावे, बियरचा खप वाढावा म्हणून जे सरकार विशेष कष्ट घेत आहे त्यांना महाराष्ट्राची नैतिकता, संस्कार, संस्कृती काय समजणार? पुढच्या दिवाळीत हे राज्य नको. बळीचे राज्य येवो. लोकांना सुख-समृद्धी आरोग्य शांतता देणारे राज्य येवो, जनतेच्या वाघ नखांनी जुलमी सरकारचा नायनाट होवो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

थोरांचा महाराष्ट्र झाला चोरांचा, अंध भक्तांची पैदास वाढली; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 7 नोव्हेंबर 2023 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. महाराष्ट्र हा थोरांचा होता तो आता चोरांचा झाला. पण देवाच्या आळंदीपेक्षा चोरांच्या आळंदीत लोटांगणे घालणाऱ्या अंधभक्तांची पैदास वाढल्याने महाराष्ट्राचे महानपण नष्ट होत आहे, असा जोरदार हल्लाबोल उद्धव ठाकरे यानी केला आहे. 2024 ची पहाट पवित्र असेल. मंगलमय असेल. 2024 पर्यंत महाराष्ट्र आणि दिल्ली पापमुक्त होऊन जनतेच्या मनातील राज्य आले असेल, नव्हे लोकांनी ठरवले तर येणारच आहे, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या राज्यात कोण सुखी आहे? असा सवाल करत सामनाच्या दिवाळी अंकातून थेट राज्य सरकार आणि केंद्र सरकारलाच सवाल केला आहे. हा सवाल करताना देशाच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला आहे. सण, उत्सव आनंदाने साजरे करावेत असे वातावरण आज नाही. जागतिक भूकेच्या निर्देशांकात भारत देश 111 स्थानावर गेला आहे. म्हणजे मोदी-शाह यांच्या राज्यात देशातील बरीचशी जनता उपासमार गरिबी आणि भूकेशी झुंजत आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दैनिक ‘सामना’च्या दिवाळी अंकातून उद्धव ठाकरे यांनी ही टीका केली आहे.

गुजरातच्या कुबड्या घेऊन जगावं…

इंग्रजांनी दीडशे वर्ष केली नाही त्यापेक्षा जास्त लूट गेल्या 10 वर्षात होताना आपण पाहत आहोत. या लुटीचा माल खोके भरून राजकारणात येतो. त्या खोक्यांचा टेकूवर बेकायदेशीर सरकारं उभी केली जात आहेत. नव्या राज्य व्यवस्थेत महाराष्ट्र हा भारताचा आधार राहू नये, दिल्लीचे पायपुसणे म्हणून महाराष्ट्राने गुजरातच्या कुबड्या घेऊन जगावे असे दिल्लीश्वराने ठरवले आहे आणि महाराष्ट्राच्या एक फुल दोन हाफ सरकारने ते मान्य केले आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

आम्हाला पोटदुखी नाही, पण…

मुंबईच्या तोडीस तोड गांधी नगर गिफ्ट सिटी उभारल्याची पोटदुखी आम्हाला नाही. मुंबईसारखी आणखी शहरे देशात निर्माण व्हायला हवीत. विकास आणि रोजगार हातात हात घालून पुढे जावेत. पण मुंबई लंकेची पार्वती करून गांधीनगर उभारले जात आहे. मुंबईतील लुटीच्या पैशांवर आपापले आशियाने महाराष्ट्राबाहेर उभारले जात आहेत. इंग्रजांनी हिंदुस्तान लुटला आणि ब्रिटनची धन केली. नवे इंग्रज मुंबई, महाराष्ट्र लुटून नव्या वेस्ट इंडिया कंपनीची श्रीमंती वाढवत आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आवाज उठवायचा कोणी?

भाजपचे दात तोंडात नसून पोटात आहेत. लचके तोडण्यासाठीच ते दात वापरले जातात. त्याच दातांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा लचका तोडला. शिवसेना तोडली की मुंबईचा लाचका तोडण्याचा मार्ग मोकळा. शिवसेनेबरोबर राष्ट्रवादीही तोडली की विदर्भाचा घास गिळायलाही मोकळे. मुंबईवर मराठी माणसांचा अधिकार राहूच नये यासाठी नीच पद्धतीने राजकारण केले जात आहे. मुंबई महानगरपालिकेत दिल्लीच्या आदेशाने बसवलेला प्रशासक नावाचा बाहूला मुंबईची वाट लावत आहे. पण आवाज उठवायची कोणी?, असा सवाल त्यांनी केला आहे.