उन्मेष पाटील यांनी शिवबंधन बांधताच उद्धव ठाकरे भाजपवर बरसले; म्हणाले, वापरा आणि फेका ही तर…

| Updated on: Apr 03, 2024 | 1:19 PM

बैठकीला न बोलावणं आणि अपमान करणं हे प्रकार सुरू होते. म्हणून स्वाभिमान गहान न ठेवण्याचा निर्णय घेतला. तुम्ही स्वाभिमानाची लढाई सुरू केली. त्यात सामील होण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आम्ही उत्तर महाराष्ट्रात शिवसेना रुजवू. पदासाठी नाही, खासदार होण्यासाठी नाही तर कार्यकर्ता म्हणून काम करण्यासाठी आलो आहे, असं भाजपमधून शिवसेनेत आलेले खासदार उन्मेष पाटील म्हणाले.

उन्मेष पाटील यांनी शिवबंधन बांधताच उद्धव ठाकरे भाजपवर बरसले; म्हणाले, वापरा आणि फेका ही तर...
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जळगावमधील भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी अखेर ठाकरे गटात प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. उन्मेष पाटील यांच्यासोबत त्यांच्या शेकडो समर्थकांनीही ठाकरे गटात प्रवेश केला. पाटील यांच्या पक्ष प्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला. वापरा आणि फेका ही भाजपची वृत्ती आहे. आपल्याला याच वृत्तीचा पराभव करायचा आहे, असा घणाघाती हल्लाच उद्धव ठाकरे यांनी चढवला.

खासदार उन्मेष पाटील त्यांच्या शेकडो समर्थकांसह आज मातोश्रीवर आले होते. यावेळी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तुमच्या सर्वांचं शिवसेनेत स्वागत करतो. तुमच्या आणि माझ्या भावना सारख्या आहेत. तुमच्या व्यथा तुम्ही बोलत होता, तेव्हा त्या माझ्या आहेत असं मला वाटत होतं. तुम्ही भाजप वाढवण्यासाठी काम केलं. तसंच शिवसैनिकांनीही काम केलं. पण भाजपने वापरा आणि फेकून द्या ही प्रवृत्ती घेतली. तुम्ही धाडस केलं. प्रवाहाच्या विरुद्ध एका मोठ्या पुरात उडी मारली. काळजी करू नका. हा प्रवाह जनमताचा आहे. प्रवाह एकदा फिरला तर मोठमोठे ओंडके वाहून जातात. तशी भाजपची अवस्था होणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

फसगत करणाऱ्यांना…

आज माझ्याकडे काही नाही. जे तिकडे गेले ते खोकेबाज म्हणून ओळखले जातात. जळगावातही गद्दारी झाली. सत्ता आहे तिथे लोक जातात, ते लोक गेले. तुम्ही सत्ता आणण्यासाठी… जनतेची सत्ता आणण्यासाठी तुम्ही आमच्याकडे आलात. तुमचे आमचे विचार एक आहेत. मध्ये आपली फसगत झाली. त्या फसगत करणाऱ्यांना निवडून द्यायचं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.

आडवे येतील त्यांची वाट लावू

आम्ही जळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपला सोडत आलो. मागच्यावेळी तुम्ही उभे होता. आम्हाला चिंता नव्हती. आता शिवछत्रपतींचा अस्सल भगवा संसदेत जाणर आहे. आपली साधी लोक आहेत. भाजपने वापर करून, लोकांना फेकलं. ती लोकं आपल्याकडे येत आहेत. ही लोकं आवाज उठवणारी आहेत, शेपट्या घालणारी नाहीत, हे तुम्ही दाखवलं आहे. आपण एकत्र विकासाची वाटचाल करू. जे आडवे येतील त्यांची वट लावून पुढे जाऊ, असंही ते म्हणाले.

काम करणाऱ्यांची कदर नाही

यावेळी उन्मेष पाटील यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. भाजप सोडण्याचं कारणही त्यांनी सांगितलं. उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज झाला का असं विचारलं जातं. राजकारणात आमदार, खासदार होणं हे साध्य नव्हतं. काम करत असताना शासकीय योजनांचा पॅटर्न आता सुरू आहे तो आपण सुरू केला होता. जळगावात हा पॅटर्न केला होता. कोणतीही चिरीमिरी न देता केला. लोकांना पैसे देऊन आपण आणलं नाही. पण पक्षात पॉलिसी मेकरची किंमत नाही. काम करणाऱ्यांची कदर नाही. मला न विचारता दुसऱ्यांना लोकसभेची उमेदवारी दिली गेली, अशी खदखद उन्मेष पाटील यांनी व्यक्त केली.

बदल्याच्या राजकारणाचा त्रास

देशातील पहिल्यांदा निवडून आलेल्या 292 खासदारांमध्ये चांगलं काम करणाऱ्यात माझं नाव होतं. मी प्रामाणिकपणे काम केलं. जनता आणि संसदेतील दुवा म्हणून काम केलं. मला बदला घेण्यासाठी पद दिलं नाही तर बदल करण्यासाठी पद दिलं होतं. पण भाजपातील बदल्याचं राजकारण त्रास देणारं होतं. त्याचा राग येत होता. वेदना होत होत्या. बदल करण्याऐवजी बदल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये रुजवले जात आहे. त्या पापाचे वाटेकरी होऊ नये म्हणून वेगळा होण्याचा विचार केला, असं उन्मेष पाटील म्हणाले.