मुंबई: केंद्र सरकारने काऊ हग डे साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून दैनिक ‘सामना’तून जोरदार टीका करण्यात आली आहे. गाईला मिठी मारायला सांगता. मग उधळलेल्या बिग बूलच्या गुन्ह्यांच्या चौकशीचे काय? असा सवाल करतानाच गोमांस खाण्यावरून लोकांच्या हत्या का घडवल्या? त्याचं उत्तर देशवासियांना दिलं पाहिजे, असा सवाल सामनातून करण्यात आला आहे. दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून हा सवाल करण्यात आला आहे.
अदानीविरोधात संसदेत घोषणा सुरू असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानीच्या घोटाळ्यावर लोकसभा आणि राज्यसभेत एक शब्दही उच्चारला नाही. पण अदानी घोटाळ्यावर उतारा म्हणून 14 फेब्रुवारी रोजी गाय अलिंगन दिन साजरा करण्याचे फर्मान सोडलं आहे.
गाय ही भारताच्या संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचा कणा आहे. गाय कामधेनू आहे. तिला मिठी मारल्याने उन्नती मारा, असे आदेश केंद्राने दिल्याचं दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून म्हटलं आहे.
अदानी घोटाळ्यावर पंतप्रधानांकडून स्पष्टीकरण हवे होते. पण मोदी सरकारने पुन्हा एकदा धर्माच्या गुंगीचे औषध देऊन गप्प केले आहे. मोदी संसदेत अदानीवर बोलले नाही. पण त्यांचे सरकार गायीवर बोलले. अदानी शेअर बाजारातील बिग बुल आहेत. मोदी त्या बिग बुलला मिठी मारून बसले आहेत. ते मिठी जराही सैल करायला तयार नाहीत, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी गोमांस खाणाऱ्यांनाही संघाचे दरवाजे उघडे असल्याचं म्हटलं आहे. गोमांस खाऱ्यांना संघाचे दरवाजे उघडे असतील तर मग गोमांस खाण्यावरून हत्या का घडवल्या? याचे उत्तर देशाला मिळायला हवे, असंही म्हटलं आहे.
गायीला मिठी मारल्याने अदानींसह सर्व महाघोटाळ्यांचे पाप धुवून निघणार आहे काय? गाय हा उपयुक्त पशू आहे. असं वीर सावरकर म्हणायचे. सावरकरांचे हे विचार भाजप आणि संघ परिवाला मान्य आहे काय? गायीला मिठी मारल्याने भावनिक उन्नती होते, असं मानलं तर हा प्रकार गायीलाही मान्य व्हायला हवा ना? असे टोलेही अग्रलेखातून लगावण्यात आले आहेत.
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी चारा-पाण्याशिवाय हंबरणाऱ्या गाईला मिठी मारल्याने उधळलेल्या बिग बुलच्या गुन्ह्यांची चौकशी मोदी सरकार करणार आहे काय? असा सवालही यावेळी करण्यात आला आहे. त्यामुळे आता भाजप त्यावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.