मुंबई | 3 जानेवारी 2024 : राज्यभरातील अंगणाडी सेविकांचं आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. या अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज आझाद मैदानावर दाखल झाले. यावेळी त्यांनी अंगणवाडी सेविकांना उद्देशून मोठं वक्तव्य केलं. मुख्यमंत्री असताना कोरोनाचं संकट आलं. त्यानंतर आजारपण आलं, ऑपरेशन झाल्यानंतर शिवसेना नेते यांनी बंड पुकारलं, नाहीतर अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य केल्या असत्या, असं उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले. “मी आज तुमच्यासमोर नेता म्हणून नाही तर तुमचा भाऊ म्हणून आलो आहे”, असंदेखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. “नवीन वर्ष नेहमीच्या प्रथेप्रमाने भरभराटीने सुरु झालं आहे. विशेष म्हणजे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्या निमित्ताने तुम्ही हे आंदोलन मुंबईत आणलं आहे. हल्ली क्रांतीज्योती, क्रांतीसूर्य, महात्मा अशी बिरुदं लाऊ शकू अशी माणसंच राहिलेली नाहीत”, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली.
“पाटील साहेब तुम्ही बोललात की, सावित्रीच्या लेकी, जरुर, तुम्ही सावित्रीच्या लेकी आहातच, पण ज्या सावित्रीबाईंचा उल्लेख आपण क्रांतीज्योती करतो त्यांच्या ज्योती तुमच्यात तेवत आहेत की नाही? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्योती शांतपणे, मंदपणे तेवणारे असतात, पण असंख्य ज्योती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याची मशाल पेटते, ती मशाल कोणाचीही सत्ता असो, जाळून खाक करु शकते”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी सर्व आंदोलकांना टाळ्या वाजवण्याचा आग्रह केला. त्यानंतर त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “या टाळ्या मी माझ्या भाषणासाठी वाजवून घेतल्या नाहीत तर तुमच्याजवळ जी ताकद आहे, जे हात जनतेची सेवा करतात, म्हणजे मी तर म्हणेन तुम्ही देशाची सेवा करतात, हे सेवा करणारे हात एकमेकांवर आपटले तर आवाज एवढा येतो, सरकारच्या कानाखाली आपटले तर आवाज केवढा मोठा येईल”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
“मला एका गोष्टीचं नाही म्हटलं तरी खेद आहेच, कारण मधल्या काळात मी मुख्यमंत्री होतो, काल पाटील साहेब आले, रानडे साहेब आले, त्यांनी मला आजचं आमंत्रण दिलं. त्यांना मी म्हटलं की, मी काय म्हणून तुमच्याकडे येऊ? मी मुख्यमंत्री होतो ना? पण मुख्यमंत्री असताना मी काही करु शकलो नाही. त्यांनी मला सांगितलं की, उद्धवजी तुमच्याबद्दल आमच्या मनात प्रश्न नाही. तुम्ही ज्या काळात मुख्यमंत्री होता त्या काळात पूर्ण जग कोरोनाचा सामना करत होतं. या सामन्यावेळी पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये पहिलं नाव माझं होतं. पण ते माझं नाव नव्हतं तर ते तुमचं सगळ्यांचं नाव होतं. कारण तुम्ही मेहनत करत होता. घराघरात जाऊन कोरोनाचा रुग्ण शोधणं हे सर्व तुम्ही करत होता”, अशी आठवण ठाकरेंनी सांगितली.
“तुमचा डिसेंबरपासून हा लढा सुरु आहे. सरकार ऐकतंय का? त्यांनी विचारलं नवरा ऐकतो का? अरे हो किंवा नाही? अरे नवरा म्हणजे सरकार आहे का न ऐकायला? तुमच्या मनात एक करुणा आहे. प्रत्येकवेळी एक मंत्री तुमच्याजवळ येतो. हे अधिवेशन जाऊद्या, पुढच्या अधिवेशनाला आम्ही याचा निकाल लावतो. अरे पुढच्या अधिवेशनापर्यंत तू टिकशील का? तुझं सरकार राहील का? तुला दिल्लीतून जसं करायला लावलं जातं तसं तू करतोस”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
“मी नागपूरला अधिवेशनासाठी गेलो तेव्हा जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन करणाऱ्यांनी मला आमंत्रण दिलं. मी गेलो तिकडे. कोरोनाचं संकट टळलं आणि जरा कुठे कामाला सुरुवात करतोय तेवढ्यात माझ्या ऑपरेशनचं निघालं. त्यातून उभा राहतोय न राहतोय तेवढ्यात त्याने गद्दारी करुन आपलं सरकारच पाडलं. पण सरकार पाडलं नसतं तर तुम्हाला आज आंदोलनासाठी इकडे यावं लागलं नसतं हा माझा दिलेला शब्द आहे. तुमची ताकद आणि सेवा हे ज्यांना कळत नाही कृतज्ञ लोकं आहेत”, अशी टीका ठाकरेंनी केली.